नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या वडिलांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 20:50 IST2023-09-04T20:37:08+5:302023-09-04T20:50:41+5:30
गौतमीचे वडील बेवारस अवस्थेत सापडल्याची बातमी समोर आली होती.

नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या वडिलांचे निधन
मुंबई/पुणे - लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या वडिलांचे निधन झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच गौतमीने एका व्हिडिओच्या माध्यमातून वडिलांच्या आजारपणाबद्दल माहिती दिली होती. तसेच, माणुसकीच्या नात्याने मी त्यांना उपचारासाठी पुण्याला घेऊन येत आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत, अशी माहिती गौतमीने दिली होती. मात्र, आज रविंद्र पाटील यांचे निधन झाले. गौतमीसह तिच्या चाहत्यांसाठी ही दु:खद घटना आहे.
गौतमीचे वडील बेवारस अवस्थेत सापडल्याची बातमी समोर आली होती. ३१ ऑगस्टच्या संध्याकाळी साडेपाच वाजता सूरत बायपास हायवेवर एक व्यक्ती बेवारस अवस्थेत स्थानिकांना आढळली. स्थानिकांनी स्वराज्य फाऊंडेशनशी संपर्क साधला. त्यानंतर स्वराज्य फाऊंडेशनचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले आणि तिथून तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. गौतमी पाटीलने या वृत्ताची दखल घेत त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली.
गौतमीने व्हिडिओतून दिली होती माहिती
गौतमी पाटीलने एका व्हिडिओच्या माध्यमातून घटनेची माहिती देताना, मी माझ्या वडिलांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच, त्यांना पुण्यालाही बोलावलं असून येथे त्यांच्यावर उपचार सुरू होतील. माणूसकीच्या नात्यातून मी त्यांच्यावर शक्य तेवढे उपचार करणार आहे, असे गौतमीने म्हटले होते. तसेच, मला या कामी तेथील समाजसेविका जयश्रीताई अहिराव यांची खूप मदत झाल्याचंही तिने व्हिडिओतून सांगितलं होतं.
स्वराज्य फाऊंडेशनमुळे ओळख पटली
स्वराज्य फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात पोहचल्यानंतर संबंधित व्यक्तीचा फोटो काढून ती व्यक्ती कोण आहे यासाठी फोटो व्हायरल केला. ओळख पटवण्यासाठी हा फोटो व्हायरल करण्यात आला. त्यानंतर १० मिनिटांत १०० हून अधिक कॉल कार्यकर्त्यांना गेले. ही व्यक्ती गौतमी पाटील यांचे वडील आहेत, अशी माहिती लोकांनी दिली. तोपर्यंत कार्यकर्त्यांना याची माहिती नव्हती. तरीही याची खात्री न पटल्याने रात्री नातेवाईकांशी संपर्क झाला. त्यांना प्रत्यक्ष येऊन तुम्ही शहानिशा करा असं कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यानंतर, माध्यमांत हे वृत्त झळकताच गौतमी पाटीलने तातडीने आपल्या मावशीला संबंधित रुग्णालयात पाठवले होते.