पुणे विभागात १ लाख ३६ हजार हेक्टर पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 12:23 PM2019-11-04T12:23:35+5:302019-11-04T12:27:28+5:30

येत्या पाच दिवसांत पिकांचे पंचनामे करण्याची व प्राप्त अहवालानुसार शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

Damage of 1 lakh 36 thousand hectares of crop in Pune region | पुणे विभागात १ लाख ३६ हजार हेक्टर पिकांचे नुकसान

पुणे विभागात १ लाख ३६ हजार हेक्टर पिकांचे नुकसान

Next
ठळक मुद्देविभागीय आयुक्तांची माहिती : पंचनाम्याचे काम वेगाने सुरूअवकाळी पावसामुळे पुणे विभागातील विविध ठिकाणच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान पुणे विभागात आजअखेर सरासरी १३७.२४ टक्के इतका पाऊस

पुणे : अवकाळी पावसामुळे पुणे विभागात सुमारे १ लाख ३६ हजार १४८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, त्यात सोयाबीन, भात, ज्वारी, द्र्राक्षबागा आदींचा समावेश आहे. येत्या पाच दिवसांत पिकांचे पंचनामे करण्याची व प्राप्त अहवालानुसार शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळेल, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी रविवारी दिली़.
अवकाळी पावसामुळे पुणे विभागातील विविध ठिकाणच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, स्वत: विभागीय आयुक्त म्हैसेकर यांनी दोन दिवस सोलापूर व सांगली जिल्ह्याचा दौरा केला आहे. तसेच, नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली आहे. तसेच, विभागात झालेल्या अतिवृष्टी आणि नुकसानाबाबत माहिती रविवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितली. याप्रसंगी म्हैसेकर म्हणाले, की विभागामधील सांगलीत ६५ हजार २६७ हेक्टर, सोलापुरात ३६ हजार ३४५ हेक्टर, पुणे जिल्ह्यात २१ हजार ६८१ हेक्टर, सातारा जिल्ह्यात ११ हजार ८०० हेक्टर व कोल्हापूर जिल्ह्यात १ हजार ५५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातही प्रामुख्याने सोयाबीन, भात, ज्वारी, द्र्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे कुठलाही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला विमा कंपनी किंवा शासनाकडून मदत केली जाणार आहे. याकरिता सर्व विमा कंपनीचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी यांची बैठक घेण्यात आली आहे, असेही म्हैसेकर यांनी नमूद केले.
......
पावसामुळे ५१ तालुके बाधित
अवकाळी पावसामुळे पुणे विभागातील ५१ तालुके बाधित असून, विभागातील १ लाख ३६ हजार १४८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, असे नमूद करून म्हैसेकर म्हणाले, विभागातील सर्वच भागांतील पंचनामे करण्याचे काम सुरू असून, पुन्हा पाऊस आला नाही तर येत्या पाच नोव्हेंबरपर्यंत पंचनाम्याचे काम पूर्ण होईल. पंचनाम्यासाठी जिओ टॅगिंग फोटो काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांच्या माध्यमातून पंचनामे केले जात आहेत. ज्या पिकाचा विमा काढण्यात आलेला आहे, त्याबाबतची वेगळी माहिती घेऊन संबंधित शेतकºयांचे पंचनामे करून घेतले जात आहेत.
..........
विभागातील पाऊस 
पुणे विभागात आजअखेर सरासरी १३७.२४ टक्के इतका पाऊस झाला असून, सांगली जिल्ह्यात सर्वाधिक १८२.५ टक्के पाऊस झाला आहे. पुणे जिल्ह्यात १५८.५ टक्के, सातारा जिल्ह्यात १७०.८६ टक्के, सोलापूर जिल्ह्यात ९१.७५ टक्के, तर कोल्हापूर जिल्ह्यात १२०.२४ टक्के इतका पाऊस झाला असल्याचेही डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.

Web Title: Damage of 1 lakh 36 thousand hectares of crop in Pune region

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.