पुणे : सोशल मीडियावरील शेअर मार्केटची लिंक ओपन करणे एका खासगी कंपनीतील महिला अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले. त्यांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून तब्बल ३६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी नाग्रस रोड औंध येथील ४४ वर्षीय महिलेने चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सायबर चोरट्यांविरोधात माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मगरपट्टा येथील एका खासगी कंपनीत काम करतात. त्यांना सोशल मीडियावर शेअर मार्केट संदर्भातील लिंक आली होती. तिने लिंक ओपन केली असता, तिला एका व्हॉट्सअॅप ग्रुपला अॅड करण्यात आले. यामध्ये २०० जणांचा एक ग्रुप होता. यामध्ये सुरुवातीला शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर फिर्यादीला तिचे शेअर मार्केटमध्ये खाते उघडण्यासाठी पॅन कार्ड, आधारकार्ड आदी कागदपत्रे मागवण्यात आली.
फिर्यादीने सुरुवातीला ५० हजार गुंतवणूक करून खाते उघडले. तेव्हा फायदा होत असल्याचे दिसले. यानंतर फिर्यादीने ३६ लाख ५० हजारांची गुंतवणूक केली. तेव्हा तिला ६८ लाख रुपये फायदा झाल्याचे दिसून येत आले. यानंतर तिने ग्रुपवर रक्कम काढण्याची विनंती केली. त्यांनी खाते व्यवस्थापकाशी संपर्क साधला असता, तिने तुम्हाला २ लाख शेअर दिले आहेत. ते पहिले खरेदी करावे लागतील असे सांगितले.
फिर्यादीने पैसे नसल्याचे सांगितल्यावर त्यांना लोन देण्यात येईल असे सांगितले गेले. फिर्यादीने लोन घेण्यास नकार दिला, तेव्हा त्यांना तुमचे बँक खाते, संपत्ती सील केली जाईल तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी धमकी दिली. फिर्यादीने ग्रुपमधील एकाशी फोनवर संपर्क साधला असता, त्यानेही अशा प्रकारे फसवणूक झाल्याचे सांगितले. यामुळे फिर्यादीने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक ननवरे करत आहेत.