प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या मनमानीला चाप; बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 17:43 IST2025-06-08T17:43:36+5:302025-06-08T17:43:52+5:30

विद्यार्थ्याचे नाव, आरोग्य संस्थेचे नाव, विद्यार्थ्यांची येण्याची वेळ, जाण्याची वेळ, कामाचे तास आदी बाबींचा स्पष्ट उल्लेख करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Curbing the arbitrariness of trainee doctors; Biometric attendance mandatory | प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या मनमानीला चाप; बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या मनमानीला चाप; बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक

पुणे : वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना सहा महिन्यांसाठी जिल्हा रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये इंटर्नशिप करणे बंधनकारक आहे. मात्र, प्रशिक्षणार्थी डॉक्टर त्यांना नेमून दिलेल्या आरोग्य संस्थेमध्ये उपस्थित राहात नसल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे. महिन्यातून सहा ते सात दिवसच हजेरी लावणाऱ्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी त्यांच्या आंतरवासिता (इंटर्नशिप) काळात त्यांना बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करण्यात आली आहे. आंतरवासिता प्रमाणपत्राला बायोमेट्रिक हजेरी जोडली जाणार आहे. त्यानुसारच त्यांचा पगार काढण्यात येणार आहे. याबाबतचे पत्र पुणे परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांना पाठवले आहे.

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची यादी संबंधित आयुर्वेद, युनानी महाविद्यालये किंवा महाराष्ट्र वैद्यकीय परिषद यांच्याकडून उपसंचालक कार्यालयाला मिळते. त्यानुसार, संबंधित विद्यार्थ्यांना आंतरवासिताकरिता वर्ग केले जाते. आयुर्वेदिक वैद्यक आणि शस्त्रक्रिया पदवी (बीएएमएस), युनानी वैद्यक आणि शस्त्रक्रिया पदवी (बीयुएमएस) व परदेशातून वैद्यकशास्त्र व शस्त्रक्रिया पदवी परीक्षेचा (एमबीबीएस) वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन ते सहा महिन्यांसाठी जिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आंतरवासिता करायची असते. त्यांना आता यापुढे बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे घेण्यात आला आहे.

संबंधित आरोग्य संस्थेमधील वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना इंटर्नशिप पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देताना त्यासोबत संबंधित आंतरवासिता विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक हजेरीपत्रक जोडायचे आहे. यामध्ये विद्यार्थ्याचे नाव, आरोग्य संस्थेचे नाव, विद्यार्थ्यांची येण्याची वेळ, जाण्याची वेळ, कामाचे तास आदी बाबींचा स्पष्ट उल्लेख करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बायोमेट्रिक हजेरी पत्रकाची सत्यता तपासूनच संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वतःच्या सही व शिक्क्यासह प्रमाणित करायचे आहे. आरोग्य संस्थांना देण्यात येणाऱ्या नियमित भेटींमध्ये विद्यार्थी नियमितपणे उपस्थित आहेत किंवा नाहीत, याची पडताळणी वरिष्ठांकडून केली जाणार आहे.

Web Title: Curbing the arbitrariness of trainee doctors; Biometric attendance mandatory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.