दंगे घडणे हे राज्यांचे अपयश , विभूती नारायण राय यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 04:11 IST2018-07-11T04:11:27+5:302018-07-11T04:11:55+5:30
राष्ट्रीय पोलीस अकादमीकडे या दंगलींच्या अभ्यासाचा अहवाल सादर केला होता. मात्र, हा अहवाल प्रसिद्ध करण्यास बंदी घालण्यात आली.

दंगे घडणे हे राज्यांचे अपयश , विभूती नारायण राय यांची टीका
पुणे - राष्ट्रीय पोलीस अकादमीकडे या दंगलींच्या अभ्यासाचा अहवाल सादर केला होता. मात्र, हा अहवाल प्रसिद्ध करण्यास बंदी घालण्यात आली. या अभ्यासावरून पोलीस दलात काहीतरी बदल होईल असे वाटले होते; मात्र पोलीस दलाने या अभ्यासाकडे गांभीर्याने पाहिले नसल्याची खंत माजी पोलीस महासंचालक विभूती नारायण राय यांनी व्यक्त केली. तसेच, दंगे घडणे हे राज्यांचे मोठे अपयश असून, राज्यांना दंगलीची जबाबदारी घ्यावी लागेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
लोकवाङमय गृहतर्फे विभूती नारायण राय यांच्या विजय दर्प यांनी अनुवादित केलेल्या ‘जमातवादी दंगली आणि भारतीय पोलीस’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राय बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ कामगार नेते भालचंद्र कानगो, माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक अशोक धिवरे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभागप्रमुख डॉ. शशिकला राय आणि विजय दर्प उपस्थित होते. राय म्हणाले, ज्यावेळी समाजात दंगली घडतात, तेव्हा लोकांचा पोलिसांवरचाच नव्हे तर राज्यकर्त्यांवरचाही विश्वास उडतो. १६०९ मध्ये देशात पहिला जातीय दंगा झाल्याची नोंद आहे. १७०३ मध्ये बनारस येथे दंगा झाला होता. जातीय दंग्यात खाकी कपड्यातील पोलीस राज्याचे प्रतिनिधित्व करत असतो. पोलीस चांगले वर्तन करत असेल तर देश चांगले वर्तन करतो असे समजावे. राष्ट्रीय पोलीस अकादमीने मला १९९४ मध्ये शिष्यवृत्ती दिली. देशातील १० जातीय दंग्यांची निवड केली. माझ्या अभ्यासाचा अहवाल अकादमीकडे सादर केला. मात्र, त्यांनी तो प्रसिद्ध करण्यावर बंदी घातली. या अहवालातून पोलीस दलात सुधारणा होईल असे वाटले होते मात्र तसे झाले नाही. २००४ मध्ये गुजरात दंगे घडले. मुस्लिम दंग्याची सुरुवात करतो, असा समज आहे; मात्र दंगलींमध्ये मुस्लिम सर्वाधिक बळी पडले आहेत. सरकारी आकडे कितपत विश्वासार्ह आहेत ते तपासायला हवे. ३० टक्के अल्पसंख्याक समाजाचा पोलिसांवर विश्वास नसेल तर हा देश कसा प्रगती करेल, दंगे हे राज्याचे अपयश आहे संविधान धोक्यात आहे. निवडणुकांच्या काळात जनताही आम्हाला स्वच्छ पोलीस हवा अशी मागणी का करीत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
दंगली का घडतात? याबद्दल चर्चा कुणीच करीत नाही, असे सांगून अशोक धिवरे यांनी दंगलीमागच्या मानसिकतेवर प्रकाश टाकला. हिंसाचारातून दुसऱ्या समाजामध्ये पूर्वग्रहदृष्टिकोन तयार केला जातो. दंगलीतून भावनिक व बौद्धिक स्तरावर निर्माण केल्या जातात. हिंसेचे तर्क हे कालसापेक्ष असते. दंगली मुस्लिम सुरू करतात हे पसरवले जाते.
बºयाच घटना या परिस्थितीशी विसंगत असतात, त्याच्यामागे धार्मिकता हेच कारण असते. दंगली या नियोजनबद्ध पद्धतीने सुरू केल्या जातात. यातच दंगलींमध्ये पोलिसांचे वर्तन हे पक्षपाती असते, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
यासाठी पोलीस दलात अल्पसंख्याकांचे प्रमाण वाढले पाहिजे. पोलिसांना सर्वधर्मसमभावाबाबत प्रशिक्षण देण्याची गरज आहे. राज्यात दंगली घडल्या, तर फौजदाराला गुन्हेगार ठरवले जाते. पण, जिल्हाधिकाºयाला शिक्षा झाल्याचे ऐकिवात नाही. यासाठी दंगलीची जबाबदारी निश्चित करून त्याला संविधानिक रूप देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कानगो म्हणाले, ‘अल्पसंख्याक समाजाला पोलीस समाजाचे ऐकतात असे वाटते, तर अल्पसंख्याक समाजाचे लाड केले जातात असे बहुसंख्याक लोकांना वाटते, हा तिढा कसा सोडवणार?’ हा खरा प्रश्न आहे.