Pune Police: गुन्हेगारांनो पोलिसांचा अंत पाहू नका, दादागिरी काय असते ते दाखवू, पुणे पोलीस आयुक्तांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 09:38 IST2024-06-27T09:38:25+5:302024-06-27T09:38:57+5:30
गेल्या काही दिवसांत शहरात ड्रग्ज प्रकरण, अनधिकृत पब यासह अवैध धंदे समोर येतायेत, पोलिसांचा संयम सुटला तर कडक कारवाई

Pune Police: गुन्हेगारांनो पोलिसांचा अंत पाहू नका, दादागिरी काय असते ते दाखवू, पुणे पोलीस आयुक्तांचा इशारा
पुणे: गुन्हेगारांनो पोलिस यंत्रणेचा अंत पाहू नका, सुरुवातीला हात जोडू पण संयम तुटला तर कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा सज्जड दम पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. पोलिसांची दादागिरी काय असते, ते दाखवू असा इशारा अवैध व्यवसाय करणाऱ्यांना त्यांनी दिला. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नागरी संवादाचे आयोजन येरवडा परिसरात करण्यात आले होते. सामाजिक सलोखा, वाढती बाल गुन्हेगारी, वाढती व्यसनाधीनता आणि कायदा सुव्यवस्था या विषयावर पोलिस आयुक्तांनी संवाद साधला.
गेल्या काही दिवसांत शहरात ड्रग्ज प्रकरण, अनधिकृत पब यासह अवैध धंदे समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर अमितेश कुमार यांनी कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मारहाण करणे त्याचे व्हिडीओ काढून सोशल मीडियावर टाकत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहराची शांतता अबाधित राहण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे. पोलिसांचा संयम सुटला, तर कडक कारवाई करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले. येरवड्यात आंतरधर्मीय विवाहामुळे झालेल्या खुनामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर अमितेश कुमार बोलत होते. गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारी टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले आहेत.