तेरा वर्षांच्या संसारानंतर जोडप्याचा परस्पर संमतीने घटस्फोट; वडिलांकडे मुलांचा ताबा

By नम्रता फडणीस | Updated: June 13, 2025 16:58 IST2025-06-13T16:56:14+5:302025-06-13T16:58:23+5:30

वेगवेगळे राहूनही मतभेद मिटण्याची शक्यता दिसली नाही. त्यामुळे त्यांनी समुपदेशन आणि परस्पर सल्ल्याने कायदेशीररीत्या घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

Couple divorces by mutual consent after thirteen years of marriage; father gets custody of children | तेरा वर्षांच्या संसारानंतर जोडप्याचा परस्पर संमतीने घटस्फोट; वडिलांकडे मुलांचा ताबा

तेरा वर्षांच्या संसारानंतर जोडप्याचा परस्पर संमतीने घटस्फोट; वडिलांकडे मुलांचा ताबा

पुणे : दोघांचा तेरा वर्षांचा संसार. कायमच दोघांमध्ये मतभेद व्हायचे. अखेर दोघांनीही एकमेकांच्या संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील कौटुंबिक न्यायालयाने या दाम्पत्याच्या परस्पर संमतीने दाखल झालेल्या घटस्फोट अर्जास मंजुरी दिली. विशेष म्हणजे, या प्रकरणात मुलांचा ताबा वडिलांकडे सोपवण्यात आला.

राकेश आणि स्मिता (नावे बदललेली) यांचा विवाह २०१० साली झाला होता. संसाराच्या पहिल्या काही वर्षांत सर्व काही सुरळीत होते. त्यांना दोन अपत्ये झाली. मात्र, काही वर्षांपासून दोघांमध्ये मतभेद वाढत गेले. संवाद कमी होत गेला, कुरबुरी वाढत गेल्या. वाद वाढत गेल्याने डिसेंबर २०२३ पासून त्यांनी वेगळे राहण्यास सुरुवात केली.

वेगवेगळे राहूनही मतभेद मिटण्याची शक्यता दिसली नाही. त्यामुळे त्यांनी समुपदेशन आणि परस्पर सल्ल्याने कायदेशीररीत्या घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हिंदू विवाह अधिनियम, १९५५ अंतर्गत कलम १३(ब) अन्वये परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि घटस्फोट मंजूर केला. पतीच्या वतीने ॲड. गायत्री कांबळे यांनी बाजू मांडली. 

‘सध्याच्या काळात परस्पर संमतीने होणाऱ्या घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी समाजात घटस्फोट हा कलंक समजला जात असे; पण आता व्यक्ती स्वातंत्र्य, मानसिक आरोग्य आणि परिपक्वता यांच्या दृष्टिकोनातून विभक्त होण्याची निवड केली जाते. नात्यांचा अनादर न करता, परस्पर सन्मान राखून घेतलेला घटस्फोट ही एक जबाबदारीची आणि सजग भूमिका असते.  - ॲड. गायत्री कांबळे, पतीच्या वकील 

Web Title: Couple divorces by mutual consent after thirteen years of marriage; father gets custody of children