चार वर्षाच्या मुलीला पळवणाऱ्या दाम्पत्याला बेड्या; नरबळी देण्यासाठीच पळवून आणल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 20:00 IST2022-07-24T20:00:07+5:302022-07-24T20:00:28+5:30
विमल संतोष चौगुले (वय २८), संतोष मनोहर चौगुले (वय ४१, रा. महादेवनगर जुन्नर) असे या दांम्पत्यांचे नाव

चार वर्षाच्या मुलीला पळवणाऱ्या दाम्पत्याला बेड्या; नरबळी देण्यासाठीच पळवून आणल्याचा संशय
जुन्नर : पिंपरी-चिंचवड येथील चार वर्ष मुलीला जुन्नर येथे पळवून आणून राहत्या घरी डांबून ठेवणाऱ्या दांम्पत्याला जुन्नर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. विमल संतोष चौगुले (वय २८), संतोष मनोहर चौगुले (वय ४१, रा. महादेवनगर जुन्नर) असे या दांम्पत्यांचे नाव आहे. दरम्यान, या दांम्पत्याला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. संबंधित मुलीला नरबळी देण्यासाठीच पळवून आणल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चिखलीतील एका चार वर्षाच्या मुलीला चौगुले दांम्पत्याने शनिवारी रात्री पळवून आणले होते. तशी माहिती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यालयाकडून जुन्नर पोलिसांना देण्यात आली. हे दाम्पत्याचे जुन्नरला आल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार जुन्नर पोलिसांनी परिसरात गस्त घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी पोलीस कर्मचारी दिलीप पवार, भरत मुठे, संतोष पठारे यांना मिळालेल्या माहितीनुसार जुने बस स्थानका समोर असलेल्या महादेवनगर येथे एका घरात पाहणी केली. त्यावेळी त्यांना चौगुले दाम्पत्य आणि एक लहान मुलगी दिसली.
दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी जुन्नर पोलिसांना व्हॉट्स ॲपवर अपहरण झालेल्या मुलीचा फोटो पाठवला होता. त्या फोटोतील मुलगी आणि चौगुले दाम्पत्याकडे असलेली मुलगी एकच असल्याचे लक्षात येताच या पोलिसांनी या दाम्पत्याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिले. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच संबंधित मुलीला पळवून आणल्याचे समोर आले. या मुलीला का पळवून आणले हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी नरबळीचा संशय व्यक्त हाेत आहे.