महाराष्ट्र साहित्य परिषदेत सत्तापालट; अध्यक्षपदी योगेश सोमण, विद्यमान तिन्ही पदाधिकारी पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 12:14 IST2026-03-16T12:13:58+5:302026-03-16T12:14:20+5:30
या निवडणुकीत परिषदेचे कार्याध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार आणि कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांचा पराभव झाला

महाराष्ट्र साहित्य परिषदेत सत्तापालट; अध्यक्षपदी योगेश सोमण, विद्यमान तिन्ही पदाधिकारी पराभूत
पुणे : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत परिवर्तन उत्कर्ष आणि साहित्य संवर्धन या दोन आघाड्यांमध्ये झालेल्या अटीतटीच्या चुरशीत अखेर साहित्य संवर्धन आघाडीने बाजी मारली. दहा वर्षांनी परिषदेत सत्तापालट झाला. निवडणुकीत संस्थेच्या अध्यक्षपदी साहित्य संवर्धन आघाडीचे उमेदवार लेखक-नाटककार योगेश सोमण, प्रमुख कार्यवाहपदी पत्रकार स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्षपदी गझलकार प्रदीप निफाडकर यांनी रविवारी (दि.१५) विजय मिळविला. या निवडणुकीत परिषदेचे कार्याध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार आणि कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांचा पराभव झाला. सोमण हे आता महामंडळाचेही अध्यक्ष असतील.
सोमण यांना ५३६५, तर मिलिंद जोशी यांना ५३२० मते पडली. केवळ ४५ मतांनी सोमण विजयी झाले. तसेच स्वाती महाळंक यांना ५४१४ व सुनीताराजे पवार यांना ५२८५ इतकी मते पडली. कोषाध्यक्षपदी निफाडकर यांना ५५३६, तर विनोद कुलकर्णी यांना ५१६८ मते पडली. तिन्ही पदांमध्ये निफाडकर सर्वाधिक ३६८ मतांची आघाडी घेत विजयी झाले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल रविवारी रात्री उशिरा जाहीर झाला. स्थानिक कार्यवाह या सात पदांच्या निवडणुकीत सुनील महाजन, सुनेत्रा मंकणी, प्रसाद मिरासदार आणि नितीन संगमनेरकर (साहित्य संवर्धन) तसेच अंजली कुलकर्णी, माधव राजगुरू आणि डॉ. आशुतोष जावडेकर (परिवर्तन उत्कर्ष) यांचा विजय झाला. निवडणुकीत १०,९०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यातील १०७१३ मते वैध आणि १८८ मते अवैध ठरली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी २०२१ मध्ये कोरोनाचे कारण देऊन सर्वसाधारण सभेत निवडणुकीऐवजी पाच वर्षांसाठी मुदतवाढ घेतली. यापूर्वी साहित्य परिषदेची निवडणूक २०१६ मध्ये झाली होती. मुदतवाढीमुळे विद्यमान कार्यकारिणीकडे दहा वर्षे परिषदेच्या कारभाराची सूत्रे होती.
महाराष्ट्र साहित्य परिषदेची २०२६-२०३१ वर्षांसाठीची पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया गेल्या तीन महिन्यांपासून सुरू होती. रविवारी (दि.१५) सकाळी ११:३० वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, प्रत्येक फेरीदरम्यान कुणाला किती मते पडली हे शेवटच्या क्षणापर्यंत गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते. सुरुवातीला पुणे जिल्हा आणि शहर प्रतिनिधी पदासाठीची मतमोजणी घेण्यात आली. जवळपास १५०० जणांनी जिल्हा व शहर कार्यवाह पदासाठी मतदान केले. मतमोजणी झाल्यानंतरही निकाल जाहीर केला नाही. पत्रकारांनी वारंवार विचारणा करूनही कुणाकडूनच कोणतीच माहिती देण्यात आली नाही. दरम्यान, परिषदेच्या पहिल्या मजल्यावरील कोहिनूर सभागृहात परिषदेच्या अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष या तीन प्रमुख पदांसाठी मतमोजणी सुरू होती. सुरुवातीपासून साहित्य संवर्धन आघडीचे वर्चस्व मतमोजणीत दिसून आले. ८ फेऱ्यांपर्यंत हेच पॅनल १३००/१४०० मतांनी आघाडीवर होते. त्यामुळे परिवर्तन उत्कर्ष पॅनलमध्ये अस्वस्थता दिसून आली. या पॅनलचे मिलिंद जोशी आणि विनोद कुलकर्णी हे निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा मतमोजणीच्या ठिकाणी सुरू होती. पत्रकारांना पण कोणतेही अपडेट दिले जात नव्हते. अखेर साहित्य संवर्धन आघाडीने परिवर्तन घडविले आणि विद्यमान कार्यकारिणीची सत्ता संपुष्टात आली. मसापच्या आजीव सभासदांनी परिवर्तन उत्कर्षपेक्षा साहित्य संवर्धन आघाडीला विजयी कौल दिला.
मसाप मतमोजणी पहिल्यांदाच पोलिस बंदोबस्तात
टिळक रस्त्यावरील साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सकाळपासूनच ७ पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात विश्रामबाग पोलिस ठाण्याचे ३ पोलिस आणि ४ होमगार्ड यांचा समावेश होता. मसापच्या निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या पोलिस बंदोबस्तात मतमोजणी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
साहित्य परिषदेच्या निवडणुकीत यंदा १०९०१ इतके भरभरून मतदान झाले..आजीव सदस्यांनी माझ्यासह साहित्य संवर्धन आघाडीला पाठिंबा दिला. निवडणुकीसाठी साहित्यप्रेमी कार्यकर्ते झटत होते. त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. - योगेश सोमण, नवनिर्वाचित अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद.