पुणे : पुणे शहरातील कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी भाजपचे 100 नगरसेवक, 8 आमदार व खासदार आजपासून चौकीदार म्हणून काम करणार असल्याची माहिती खासदार गिरीश बापट यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पुणे शहर भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीशभाऊ बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तपकिर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, शहर सरचिटणीस राजेश येनपुरे, राजेश पांडे यांनी मनपा आयुक्त कार्यालयात कोरोना नियंत्रित करण्यासाठी नियुक्त केलेल्या चार आयएएस अधिकाऱ्यांशी मंगळवारी चर्चा केली. यावेळी बापट म्हणाले, कोरोना नियंत्रण करीत ४ आयएएस अधिकाऱ्यांना शहरातील वेगवेगळे भाग वाटून देण्यात आहे आहेत. मात्र त्यांच्यामध्ये सुसूत्रीकरण होणे जरुरी आहे. आमचे असंख्य कार्यकर्ते काम करायला तयार आहेत. लाखो लोकांना जेवण, अन्नधान्य, भाजीपाला, दूध वाटप करण्याचे काम त्यांनी केले आहे. सध्या कोरोनाच्या टेस्टिंग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने संख्या वाढत आहे. त्यामुळे पुणेकरांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही बापट यांनी केले. जास्तीत जास्त कोरोना टेस्ट होण्याची आज गरज असून, ही संख्या बाहेर येणे गरजेचे आहे. आगामी काळात कोरोनाला रोखण्यासाठी १०० नगरसेवक, आमदार, खासदार चौकीदार म्हणून काम करणार आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वांना आणखी पुढे जायचे असून आजची ही बैठक यशस्वी झाली आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांशी मी संपर्कात आहे.१६२ वार्डात हा पॅटर्न राबविण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवर काम व्हावे, गावभर कार्यकर्त्यांनी फिरत बसू नये, असा सल्लाही बापट यांनी दिला. शहरात सध्या ५० टक्केच डॉकटरांनी दवाखाने उघडे ठेवले. आणखी ५० टक्के दवाखाने उघडण्यासाठी आम्ही विनंती करू. किटसह सर्व सुविधा महापालिका द्यायला तयार आहेत. खोकला झाला म्हणजे कोरोना नाही. तर, पालकमंत्री यांनी कोरोना संदर्भात बैठक घेतल्या नाहीत. त्या पार्श्वभूमीवर पत्र लिहिले होते. त्यानंतर लोकप्रतिनिधींची बैठक झाल्याची आठवण बापट यांनी करून दिली. आम्हाला कोरोनाचे राजकारण करायचे नाही. भाजप कोरोनाच्या युद्धात काम करणार आहे. राज्यभर आंदोलन केल्याने चांगला परिणाम झाला. महापालिकेच्या कामाच्या बाबत समाधनी असून,आणखी चांगले काम व्हावे. जनतेच्या हिताचे काम व्हावे. प्रशासनाने सातत्याने लोकप्रतिनिधीशी बोलले पाहिजे, अशी अपेक्षाही बापट यांनी व्यक्त केली.
पुणे शहरातील कोरोनाला रोखण्यासाठी नगरसेवक, आमदार, खासदार होणार 'चौकीदार' : गिरीश बापट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 16:22 IST
सध्या कोरोनाच्या टेस्टिंग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने संख्या वाढत आहे. त्यामुळे पुणेकरांनी घाबरून जाऊ नये..
पुणे शहरातील कोरोनाला रोखण्यासाठी नगरसेवक, आमदार, खासदार होणार 'चौकीदार' : गिरीश बापट
ठळक मुद्देकोरोना नियंत्रित करण्यासाठी नियुक्त केलेल्या चार आयएएस अधिकाऱ्यांशी मंगळवारी चर्चा