मिळकतकर धारकांच्या 'विमा कवचा' ला कोणतीही अडचण नसल्याचा पुणे महापालिकेचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 16:08 IST2020-08-10T16:08:28+5:302020-08-10T16:08:45+5:30
पुणे महापालिका प्रशासनाने, नियमित व वेळेवर मिळकत कर भरणाऱ्यांसाठी अपघाती विम्याचे ५ लाख रूपयांचे विमा कवच व कुटुंबियांना अन्य विमा सवलती देऊ केल्या होत्या.

मिळकतकर धारकांच्या 'विमा कवचा' ला कोणतीही अडचण नसल्याचा पुणे महापालिकेचा दावा
पुणे : महापालिकेचा नियमित व वेळेवर मिळकत कर भरणाऱ्या मिळकतकर धारकांना लागू केलेल्या विमा कवचास कुठलीही अडचण नसल्याचा दावा पुणे महापालिका प्रशासनाने केला आहे. तांत्रिक कारणास्तव नवीन निविदा रद्द झाली असली तरी, मागील वर्षी ज्या कंपनीला विम्याचे काम देण्यात आले होते, त्याच कंपनीला पुढील कंपनीची नियुक्ती होईपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
मिळकत कराचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने पुणे महापालिका प्रशासनाने, नियमित व वेळेवर मिळकत कर भरणाऱ्यांसाठी अपघाती विम्याचे ५ लाख रूपयांचे विमा कवच व कुटुंबियांना अन्य विमा सवलती देऊ केल्या होत्या. मात्र २७ मे रोजी पूर्वीच्या विमा कंपनीची मुदत संपल्याने नवीन विमा कंपनी नियुक्त न झाल्याने मिळकतधारकांना विमा लाभ मिळणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
दरम्यान पंडीत दिनदयाळ विमा योजनेसाठी काढलेल्या निविदेला दोन विमा कंपन्यांनी प्रतिसाद दिला असताना, त्यापैकी एक कंपनी अपात्र ठरली आहे. तर दुसºया कंपनीचे ब पाकीट उघडलेले नाही. यात तांत्रिक कारणास्तव ही निविदा रद्द करण्यात आली असली तरी फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर मागीलवर्षी विम्याचे काम ज्या कंपनीला दिले आहे, ती सरकारी विमा कंपनी असून, या कंपनीने २७ मे पासून एक्स्टेंशन देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.