Coronavirus Police : लसीकरणानंतरही पोलीस कोरोनाच्या विळख्यात; पावणे तीनशे पोलीस अधिकारी, कर्मचारी बाधित
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 00:37 IST2021-04-21T00:36:01+5:302021-04-21T00:37:09+5:30
पुणे शहर पोलीस दलातील २८१ पोलीस अधिकारी व कर्मचारी सध्या कोरोनाबाधित असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Coronavirus Police : लसीकरणानंतरही पोलीस कोरोनाच्या विळख्यात; पावणे तीनशे पोलीस अधिकारी, कर्मचारी बाधित
पुणे : पुणे शहर पोलीस दलातील ८० टक्क्यांहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला आहे. त्यांच्यातील ३५ टक्के जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. असे असताना आता आलेल्या दुसर्या लाटेत पहिला डोस घेतलेल्या अनेक पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे शहर पोलीस दलाने आता पहिल्या लॉकडाऊनच्या काळात ज्या पद्धतीने पोलिसांसाठी उपाययोजना राबविल्या होत्या. त्या पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत.
सोमवारी एकाच दिवशी ३ अधिकारी आणि २९ अंमलदार यांना लागण झाल्याचे आढळून आले आहे. पुणे शहर पोलीस दलातील २८१ पोलीस अधिकारी व कर्मचारी सध्या कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यात ३० पोलीस अधिकारी असून २५१ पोलीस अंमलदार यांचा समावेश आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर आतापर्यंत शहरातील १ हजार ९७१ जणांना लागण झाली असून त्यांच्यापैकी १ हजार ७१६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यादरम्यान १३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. चालू आठवड्यात ७४ जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
याबाबत अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी सांगितले की, शहर पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात आले असून जवळपास ३० टक्के पोलिसांना दुसरा डोस देण्यात आला आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर पोलीस दलात कोरोना बाधित होणार्यांचे प्रमाण वाढलेले दिसून आले. त्यामुळे सर्वांची रॅपिड टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात अनेक जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पहिल्या लॉकडाऊनच्या काळात ज्याप्रमाणे सुरक्षाविषयक उपाय योजना आखण्यात आल्या होत्या. त्या पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात वेलनेस ऑफिसरची नेमणूक करण्यात आली आहे. पोलीस ठाणे व विविध पोलीस कार्यालयांना मास्क, सॅनिटायझर पुरविणे़, बाधित अधिकारी व कर्मचार्यांसाठी विलगीकरण कक्षात राखीव बेड ठेवणे, तेथे त्यांना जागा मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचबरोबर पोलीस कर्मचार्यांमध्ये जागृती करण्यात येत आहे.
.........
१८ एप्रिलपर्यंतची स्थिती
उपचार घेत असलेले एकूण पोलीस - २४२ ( २७ अधिकारी, २२२ अंमलदार)
एकूण बरे झालेले - १७१६
मृत्यु - १३
एकूण बाधित १९७१
एकूण हजर पोलीस - ७४४ अधिकारी, ७९०० अंमलदार
पहिला डोस घेतलेले - ७०२९ ( ५९८ अधिकारी, ६४३१ अंमलदार)
दुसरा डोस घेतलेले - ३११९ (२१४ अधिकारी, २९०५ अंमलदार)
एकूण बाधित कुटुंबियांची संख्या - ४४६२
बाधित कुटुंबियांची संख्या - ५४९