Coronavirus News Pune: वेळप्रसंगी आणखी खासगी रुग्णालये ताब्यात घेऊ, पण उपचारासाठी बेड कमी पडू देणार नाही: विक्रम कुमार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 18:04 IST2021-04-08T17:18:28+5:302021-04-08T18:04:22+5:30
पुण्यात कोरोना रुग्ण वाढत असताना होम आयसोलेशन मध्ये असणाऱ्या रुग्णांनी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे.

Coronavirus News Pune: वेळप्रसंगी आणखी खासगी रुग्णालये ताब्यात घेऊ, पण उपचारासाठी बेड कमी पडू देणार नाही: विक्रम कुमार
पुणे: पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच महापालिका व आरोग्य विभाग प्रशासन कोरोना विरुद्धच्या लढाईत युद्धपातळीवर कार्यरत आहे.मात्र, वेळप्रसंगी आणखी खासगी रुग्णालये ताब्यात घेऊ, पण कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी बेड्स कमी पडू देणार नाही, अशी माहिती पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ.विक्रम कुमार यांनी दिली आहे.
पुणे महानगरप्पालिकेचे आयुक्त डॉ. विक्रम कुमार यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी शहरातील कोरोना परिस्थिती आणि वैद्यकीय यंत्रणेवर भाष्य केले. विक्रम कुमार म्हणाले,
बाणेर येथील इएसआय रुग्णालय ताब्यात घेणार असून १३० बेड्स कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरात येणार आहे. तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये बेड वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुढील पाच दिवसांत ५० व्हेंटिलेटर वाढवणार आहोत. आता एकूण ४०० ऑक्सिजन बेड शिल्लक असून आणखी ३५० बेड्स पुढील ३ते ४ दिवसात उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे.
शहरातील आणखी ६ खासगी रुग्णालय कोरोना रुग्णालय म्हणून घोषित करू, पण कुठल्याही परिस्थितीत कोरोना रुग्णांना उपचारासाठी बेड्स कमी पडू देणार नाही. त्यासाठी वेळप्रसंगी जास्तीत जास्त हॉस्पिटल ताब्यात घेतले जातील. सध्या शिवाजीनगर येथील जम्बो रुग्णालयात ८००पैकी ६००बेड्स कार्यरत आहेत. तसेच ५० ऑक्सिजन व ३० व्हेंटिलेटर उपलब्ध आहे.
आजमितीला शहरात महापालिकेकडे कोरोना प्रतिबंधक लसींचे एकूण २५ हजार र खासगी रुग्णालयांकडे ४५ हजार डोस शिल्लक आहे. तसेच विविध ठिकाणी एकूण १२५ केंद्र सुरू आहे. दररोज २० ते २२ हजार लोकांना लसींचा डोस दिला जात आहे. मागील ३० दिवसांत ५ लाख लोकांना लस देण्यात आली आहे अशी माहिती विक्रम कुमार यांनी यावेळी दिली. होम आयसोलेशन रुग्णांनी घरी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे.
रेमीडिसिव्हरचा प्रश्न मार्गी लागेल...
शहरात आज २००० तर उद्या आणखी जास्त रेमीडिसिव्हर औषधांचा साठा उपलब्ध होणार आहे.त्यामुळे रेमीडिसिव्हर चा निर्माण झालेला तुटवडा भासणार नाही.
पुणे महापालिकेचे कॉल सेंटरकडे खासगी संस्थेकडे चालवायला देण्यात येणार आहे. दररोज ५००फोन येत असून १५ हेल्प लाईन कार्यरत आहेत.