CoronaVirus News: ...म्हणून सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांचे प्रमाण 95 टक्के; जनुकीय रचना बदलतेय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 06:49 IST2021-02-24T01:22:09+5:302021-02-24T06:49:38+5:30
जनुकीय रचना बदलतेय : संसर्ग वाढला तरी मृत्यूदर, गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी

CoronaVirus News: ...म्हणून सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांचे प्रमाण 95 टक्के; जनुकीय रचना बदलतेय
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : कोणत्याही विषाणूचे जास्तीत जास्त संक्रमण झाले की, त्याची विष निर्माण करण्याची ताकद कमी होत जाते, हा सूक्ष्मजीवशास्त्राचा मूलभूत नियम आहे. कोरोना विषाणूच्या बाबतीत सध्या हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. सध्या महाराष्ट्रात बाधित रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. मात्र ९५ टक्के रुग्ण लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे असलेले आहेत. विषाणूचा विषारीपणा कमी झाल्याने लक्षणे कमी प्रमाणात दिसत आहेत. मृत्यूदरही लक्षणीयरित्या कमी झाला आहे, असे मत मायक्रोबायोलिज्स्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अरविंद देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १० फेब्रुवारीपासून झपाट्याने वाढत आहे. पुणे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १० टक्के असला तरी मृत्यूदर ०.७ टक्के इतका कमी आहे. त्याचप्रमाणे, सौम्य लक्षणे असलेल्यांचे प्रमाण ९५ टक्के आणि बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९७ टक्के आहे. या स्थितीमागील कारणे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने सूक्ष्मजीवशास्त्र शाखेतील तज्ज्ञांशी संवाद साधला.
जैवशास्त्रज्ञ डॉ. मिलिंद वाटवे म्हणाले, गेल्या पंधरा दिवसांत रुग्णसंख्या वाढत असली तरी मृत्यूदर खूप कमी आहे. विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये अनेक बदल झाले आहेत. त्यापैकी खूप थोड्या व्हेरियंटसबद्दल बोलले जात आहे. भारतात झालेल्या दोन अभ्यासांमध्ये दिसून आले आहे की, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांमधील विषाणूचे म्युटेशन आणि गंभीर रुग्णांमधील कोरोना विषाणूचे म्युटेशन यामध्ये फरक
आहे.
विषाणूचे ५०-१०० स्ट्रेन असू शकतात. युकेच्या स्ट्रेनमध्ये संसर्गदर वाढला होता, मात्र संक्रमणाची ताकद वाढली नव्हती. सध्याचा भारतातील स्ट्रेनही अशाच प्रकारचा असावा. संसर्ग रोखण्याचा एकमेव उपाय म्हणजे मास्क आहे. मास्कवरचा दंड दुप्पट करा, कारवाई कठोर करा, पण लॉकडाऊन नकोच.
- डॉ. अरविंद देशमुख, ,अध्यक्ष, मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी, इंडिया
विषाणू एका शरीरातून दुस-या शरीरात संक्रमण करत असताना त्याच्या जनुकीय रचनेत बदल होत असतो. आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती आणि विषाणूमध्ये कायम लढाई सुरू असते. एखाद्या लढाईत कोणीच जिंकत नसेल अथवा हारत नसेल तर त्यांच्या ताकदीत फरक पडत जातो. यूकेमध्ये विषाणूवरील प्रोटीनचे प्रमाण वाढल्याने त्याच्या संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढले. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये प्रतिकारशक्ती जास्त असल्याने विषाणूची ताकद कमी होते.
- डॉ. नानासोा थोरात, वरिष्ठ शास्त्रज्ञ, ऑक्सफर्ड विद्यापीठ, यूके