CoronaVirus Live Updates : रुग्णाची तब्येत बिघडल्यास महापालिका देणार ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 22:02 IST2021-05-19T22:01:03+5:302021-05-19T22:02:29+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक खासगी कंपन्या सामाजिक बांधिलकीतून महानगरपालिकेस शहर कोरोना मुक्त करण्याच्या दृष्टीकोनातून विविध यंत्रसामुग्री देत आहेत.

CoronaVirus Live Updates : रुग्णाची तब्येत बिघडल्यास महापालिका देणार ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स
पिंपरी - कोरोना रुग्णाची ऑक्सिजन अभावी प्रकृती बिघडल्यास तातडीची उपाययोजना म्हणून कोरोना रुग्णांना तात्पुरत्या स्वरुपात घरी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स देण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे, अशी माहिती महापौर उषा ढोरे यांनी दिली. पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक खासगी कंपन्या सामाजिक बांधिलकीतून महानगरपालिकेस शहर कोरोना मुक्त करण्याच्या दृष्टीकोनातून विविध यंत्रसामुग्री देत आहेत.
कॉनफेरडरेशन ऑफ इंडीयन इंडस्ट्रीज आणि सॅनी हेव्ही इंडस्ट्रीने सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) महानगरपालिकेचे ५० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स दिले. यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, संचालक दिपक गर्ग, उपव्यवस्थापक श्रीबाल पाटील, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
महापौर म्हणाल्या, ‘‘कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्सची मागणी करावयाची झाल्यास त्यांनी महापालिकेच्या हेल्पलाईन क्रमांकावर ७७६८००५८८८ संपर्क करावा. ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्सची मागणी केल्यास प्राप्त ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स मधून रुग्णांच्या घरी पोहोच करुन ते ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स स्थापित करुन देणेबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.’’
सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, ‘‘ कोरोना रुग्णाची ऑक्सिजन अभावी प्रकृती बिघडल्यास तातडीची उपाययोजना म्हणून मदत केली जाणार आहे. यासाठी सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांचेमार्फत १ वैद्यकीय अधिकारी व ३ कर्मचारी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.’’