Coronavirus: ऑक्सिजनचा समावेश जीवनावश्यक वस्तू कायद्यामध्ये करा, विजय दर्डा यांची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 10:07 AM2021-05-26T10:07:27+5:302021-05-26T10:11:09+5:30

Oxygen News: गावांकडे अधिक लक्ष देण्याची आणि लोकप्रतिनिधींवर सरकारी रुग्णालयात उपचार झाले पाहिजेत, असा दंडक घालण्याची गरज लोकमत एडिटोरीयल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांनी व्यक्त केली.

Coronavirus: Include Oxygen in Essential Commodities Act, suggests Vijay Darda | Coronavirus: ऑक्सिजनचा समावेश जीवनावश्यक वस्तू कायद्यामध्ये करा, विजय दर्डा यांची सूचना

Coronavirus: ऑक्सिजनचा समावेश जीवनावश्यक वस्तू कायद्यामध्ये करा, विजय दर्डा यांची सूचना

googlenewsNext

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू कायद्यामध्ये ऑक्सिजनचा समावेश झाला पाहिजे, औषध निर्माण कंपन्यांचे ऑडिट करण्याची गरज असून, गावांकडे अधिक लक्ष देण्याची आणि लोकप्रतिनिधींवर सरकारी रुग्णालयात उपचार झाले पाहिजेत, असा दंडक घालण्याची गरज लोकमत एडिटोरीयल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांनी व्यक्त केली.

इंडियन  मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेच्या वतीने होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींना आणि त्यांच्या नातेवाईकांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘कोविड’ मोफत हेल्पलाईन तयार केली आहे. या हेल्पलाईनचे रविवारी प्रमुख पाहुणे म्हणून दर्डा यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने  उद्घाटन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.  या वेळी इंडियन  मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. बी. एल. देशमुख, कार्यकारी विश्वस्त डॉ. जयंत नवरंगे, कृती समितीचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, खजिनदार डॉ. राजन संचेती, सचिव डॉ. अलका क्षीरसागर, डॉ. सुनील इंगळे आदींची उपस्थिती होती.
विजय दर्डा म्हणाले की, जगभरात कोरोनाचा प्रसार हा एक जैविक युद्धच म्हणून पाहिले जात आहे. किंबहुना ते तिसरे महायुद्धच आहे. त्यावर लस हा एक प्रभावी उपाय असल्याचे जगाने ओळखले आहे. त्यामुळे देशभरात लसीकरण मोहीम अधिक वेगाने राबविण्याची गरज आहे. 

सध्या ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर ते म्हणाले की, ऑक्सिजनचा जीवनावश्यक वस्तू कायद्यात समावेश करावा. त्यामुळे त्याची उपलब्धता वाढेल. औषध निर्माण कंपन्या या भरमसाठ दराने औषधांची विक्री करत आहेत. काही हजारातील औषधे लाखो रुपयांना विकली जात आहेत. ते रोखण्यासाठी औषध कंपन्यांचे ऑडिट करण्याची गरज आहे. त्यामुळे औषधांच्या किमतीवर अंकुश बसण्यास मदत होईल. शहरात कोरोना रुग्णांवर उपचार करण्याच्या सुविधा मुबलक आहेत. पण, गावांमध्ये भयानक परिस्थिती आहे. बेड, ऑक्सिजन, औषधे यांची टंचाई आहे. त्यामुळे गावांकडे लक्ष देण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

खासगी रुग्णालयात सर्व वैद्यकीय सुविधा तत्काळ उपलब्ध होतात. पण, सरकारी रुग्णालयांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी एखादा लोकप्रतिनिधी आजारी पडल्यास त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार झाले पाहिजेत, असा दंडक घातला पाहिजे. त्यामुळे सरकारी रुग्णालये अत्याधुनिक होण्यास मदत मिळेल, ही मागणी मी राज्यसभेतही केली होती. सामान्य माणसाविषयी आपण चर्चा करतो. मात्र सामान्यांना ‘ती’ सेवा मिळते का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 

डॉ. बी. एल. देशमुख म्हणाले, “या महामारीत आमच्या संस्थेचे ४८५० सदस्य सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून पूर्णपणे समर्पण भावनेने गेल्या दीड वर्षापासून काम करीत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे रुग्णालयांवरील ताण कमी होण्यास मदत झाली.”
डॉ. जयंत नवरंगे म्हणाले, “कोरोनावर प्रभावी औषध नाही. औषधे आणि लस महत्त्वाची आहेत.  आता लस आली आहे. त्यामुळे लसीकरण जलदगतीने करण्याची गरज आहे.  योगगुरू रामदेवबाबा यांनी नुकतीच कोरोनावरील अलोपॅथीक औषधे निरुपयोगी असल्याची टीका केली होती. त्याचा त्यांनी निषेध केला.”

डॉ. संजय पाटील यांनी इंडियन  मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेच्या कार्याची माहिती दिली. हेल्पलाईनच्या माध्यमातून प्रश्नाचे उत्तर दिले जाईल. सर्व प्रश्न -उत्तरे वेबसाईटवर टाकली जातील. त्या द्वारे अनेकांच्या शंकांचे निरसन होईल. इंडियन  मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेचे सुमारे ४८५० सदस्य लसीकरण मोहिमेत सरकारला मदत करू इच्छित आहोत. त्यासाठी सरकारकडून सकारात्मक उत्तराची अपेक्षा आहे. 

या वेळी डॉ. आरती निमकर, डॉ. दिलीप सारडा यांच्यासह संस्थेच्या बहूसंख्य सदस्यांनी ऑनलाईन उपस्थिती नोंदवली. डॉ. सचिन इंगळे यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. डॉ. राजन संचेती यांनी  प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून  दिला, तर डॉ. अलका क्षीरसागर यांनी आभार व्यक्त केले. 

डॉक्टरांचे समर्पण, सेवाभावाचे दर्डांकडून कौतुक 
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांसह अन्य डॉक्टरांच्या सेवावृत्तीचे कौतुक करताना विजय दर्डा म्हणाले की, युद्धात एखादा सैनिक हत्यारावाचून युद्ध लढतो, अशी परिस्थिती डॉक्टरांची झाली आहे. बेड, ऑक्सिजन, इंजेक्शन यांचा तुटवडा असताना डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ अहोरात्र रुग्णांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा सेवाभावामुळे डॉक्टरांना समाजात प्रतिष्ठा लाभली आहे. 
 एरवी आणि महामारीच्या काळात डॉक्टर, नर्स यांच्या  सेवेची जगात तुलनाच करता येत नाही.  त्यांनी आपला जीव धोक्यात घालून रुग्णांचे प्राण वाचविले आहेत. परंतु, संकटकाळी ओरबाडून घेण्याची वृत्ती फोफावल्याबद्दलही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.  अशा वृत्तीचा त्यांनी निषेध केला. 
तसेच डॉक्टरी शिक्षण स्वस्त करण्याची गरजही व्यक्त केली. त्यामुळे होणारा खर्च कमी झाल्याने नंतर काही  डॉक्टरांकडून रुग्णांची होणारी पिळवणूक थांबेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोट्यवधी रुपयांची महागडी उपकरणे एका डॉक्टरसाठी घेण्याऐवजी संयुक्तपणे पाच-दहा डॉक्टरांसाठी घेतली तर रुग्णावर येणारा भार कमी होईल, अशीही सूचना त्यांनी केली. 

आयएमए कोविड हेल्पलाईन क्रमांक ९१५५२९१५५२ इच्छुकांनी या व्हॉटसॲप क्रमांकावर 
Hi असा शब्द टाईप करून पाठवावा. त्यांना तातडीने डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात येईल.

Web Title: Coronavirus: Include Oxygen in Essential Commodities Act, suggests Vijay Darda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.