coronavirus : कसं हरवणार काेराेनाला ? पुणे स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 18:37 IST2020-03-20T18:35:23+5:302020-03-20T18:37:28+5:30
काेराेनामुळे अनेक कंपन्या, दुकाने, ऑफिसेस बंद झाल्याने आपल्या गावी परतण्यासाठी नागरिकांनी माेठी गर्दी पुणे स्टेशनवर केली हाेती.

coronavirus : कसं हरवणार काेराेनाला ? पुणे स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी
पुणे : काेराेनाचा प्रभाव राज्यात वाढत असल्याने मुंबई पुण्यासह अनेक शहरे बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गाेष्टी बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच मुख्यमंत्री वारंवार नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन करत आहेत. तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडण्याची विनंती करत आहेत. परंतु नागरिक मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. आज पुणे रेल्वस्टेशनवर नागरिकांनी तिकीट काढण्यासाठी सकाळपासूनच माेठी गर्दी केली हाेती. नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या हाेत्या.
मुख्यमंत्र्यांनी आज पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच मुंबई पुण्यासह अनेक महानगरे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुण्यात राज्यातील विविध भागांमधील नागरिक येत असतात. तसेच पुण्यात कामानिमित्त राहणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. राज्य सरकारच्या आदेशामुळे सर्व आस्थापने, तसेच दुकाने बंद झाल्याने कर्मचारी आपल्या मूळगावी जाण्यास निघाले आहेत. त्यामुळे पुणे रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र आहे. परिणामी काेराेनापासून संरक्षण करण्यासाठी गर्दी टाळण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला हरताळ फासला जात असल्याचे समाेर आले आहे.
दरम्यान मध्य रेल्वेकडून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबराेबर मुंबई पुणे दरम्यानच्या अनेक एक्सप्रेस 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. गर्दी कमी व्हावी यासाठी पीएमपी बसेसच्या फेऱ्या कमी केल्या असल्याने एकाच बसला माेठी गर्दी हाेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गर्दी कमी करण्याचा उद्देश सफल हाेत नसल्याचे समाेर आले आहे.