Corona virus : गिर्यारोहक जम्बो हॉस्पिटलमध्ये समन्वयाचे काम करणार; ४० जणांची फळी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 18:34 IST2020-09-08T18:33:31+5:302020-09-08T18:34:01+5:30
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात गिर्यारोहक महासंघाच्या १०० हून अधिक स्वयंसेवकांनी ‘कोव्हिड सेवक’ म्हणून काम करुन महापालिका यंत्रणेला मदत केली होती.

Corona virus : गिर्यारोहक जम्बो हॉस्पिटलमध्ये समन्वयाचे काम करणार; ४० जणांची फळी सज्ज
पुणे : सीओईपीच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड रुग्णालयामध्ये त्रुटी आढळून आल्यानंतर महापालिकेने रुग्णालयाचे कामकाज सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या स्वयंसेवकांनी महानगरपालिकेच्या मदतीसाठी कंबर कसली आहे. महासंघाने जम्बो हॉस्पिटलमधील समन्वयाचे काम पाहण्यासाठी ४० गिर्यारोहक स्वयंसेवकांची फळी सज्ज केली आहे.
महासंघाचे स्वयंसेवक गुरुवारपासून दररोज सकाळी ८ ते संध्याकाळी ८ या वेळेत विविध गटांमध्ये जम्बो सेंटरमधील रिसेप्शन सेंटरवर व्यवस्थापकीय कामांमध्ये मदत करतील. त्याचप्रमाणे, रुग्णालयामध्ये दाखल झालेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यातील समन्वयक म्हणून काम पाहतील. मदतकार्याचे नियोजन गिरीप्रेमी संस्थेकडे सोपवण्यात आली आहे.
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात गिर्यारोहक महासंघाच्या १०० हून अधिक स्वयंसेवकांनी ‘कोव्हिड सेवक’ म्हणून काम करुन महापालिका यंत्रणेला मदत केली होती. कामाची दखल घेत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सध्याच्या तातडीच्या मदतीसाठी महासंघाच्या स्वयंसेवकांना पाचारण करावे, असे सुचवले होते. त्यानुसार महापालिका आणि महासंघ यांच्यातील बैठक पार पडली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, उपायुक्त राजेंद्र मुठे, गिर्यारोहक महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, गिरीप्रेमी संस्थेचे अजित ताटे, सचिन गायकवाड आणि आनंद दरेकर उपस्थित होते.
--------------