Corona virus : खळबळजनक ! कोंढव्याच्या 'कोविड केअर सेंटर' मध्ये ६० वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 15:31 IST2020-07-06T15:28:55+5:302020-07-06T15:31:08+5:30
पंख्याच्या सहाय्याने घेतला गळफास

Corona virus : खळबळजनक ! कोंढव्याच्या 'कोविड केअर सेंटर' मध्ये ६० वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
पुणे : कोरोना पॉझिटिव्ह आल्याने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ६० वर्षीय व्यक्तीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास कोंढाव्यातील सिंहगड इन्स्टिट्यूट येथील सेंटरमध्ये घडली. आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.
गुंडाप्पा शेवरे (वय ६०, रा. चैत्रबन वसाहत, बिबवेवाड) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवरे आणि त्यांचा मुलगा हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना उपचारांसाठी कोंढव्यातील सिंहगड इन्स्टिट्यूट येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. या दोघांवर ४ जुलैपासून उपचार सुरू होते. या दोघांना ठेवलेल्या खोलीमध्ये आणखी दोन रुग्णांना ठेवण्यात आलेले आहे. एकूण चार जण या खोलीत ठेवण्यात आलेले आहेत.
सोमवारी सकाळी नाश्ता करण्यासाठी सर्वजण खोलीमधून बाहेर पडले. नाश्ता करण्यासाठी तळ मजल्यावर जायचे असल्याने शेवरे यांचा मुलगा व अन्य दोघे असे एकूण तिघेजण बाहेर पडले. शेवरे नाश्ता करण्यासाठी गेले नाहीत. जेव्हा तिघेजण नाश्ता करून परत आले तेव्हा शेवरे यांनी खोलीमध्ये पंख्याच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसले.
या घटनेची तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. डॉक्टरांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करीत आहेत.