Corona virus : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने महापालिकेकडून मनुष्यबळ पूर्ववत करण्यास सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 21:13 IST2020-10-16T21:09:10+5:302020-10-16T21:13:53+5:30
बांधकाम-मिळकत कर-पाणी पुरवठा विभागाचे मनुष्यबळ 'कोरोना ड्युटी'तून मुक्त

Corona virus : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने महापालिकेकडून मनुष्यबळ पूर्ववत करण्यास सुरुवात
पुणे : महापालिकेच्या कोविड सेंटरसह कोरोनाच्या विविध कामांसाठी तैनात करण्यात आलेले मनुष्यबळ पुन्हा त्या-त्या विभागांना देण्यात सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेच्या संबंधीत विभागांचे काम सुरू होण्यात मदत मिळणार आहे. पुण्यामध्ये ९ मार्च रोजी राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढतच गेली. या काळात महापालिकेच्या आरोग्य विभागाचे मनुष्यबळ कमी पडू लागले होते. सर्वेक्षणासह विविध सेंटरवरील स्वच्छता, कार्यालयीन कामकाज, तपासण्या आदींसाठी महापालिकेच्या अन्य विभागांचे मनुष्यबळ पुरविण्यात आले होते. बांधकाम विभाग, विद्युत, पाणीपुरवठा, मिळकत कर, आरोग्य, लेखापरीक्षण, सामान्य प्रशासन, मालमत्ता व्यवस्थापन आदी वेगवेगळ्या वीस विभागांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश यामध्ये होता.
गेल्या सहा महिन्यांपासून पालिकेची कामे ठप्प झाली होती. कोरोनाची रुग्ण संख्या कमी होताना दिसते आहे. या सोबतच जम्बो रुग्णालय आणि बणेरच्या कोविड-१९ रुग्णालयामुळे बऱ्यापैकी दिलासा मिळाला आहे. यासोबतच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू झाल्याने पालिकेच्या कोविड केअर सेंटरमधील रुग्ण संख्या कमी झाली. त्यामुळे महापालिकेने सुरुवातीच्या काळात सुरू केलेले विलगीकरण कक्ष, कोविड सेंटर आता हळूहळू बंद करायला सुरुवात केली आहे. महापालिकेच्या एकूण २७ पैकी २१ कोविड केअर सेंटरला तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आले आहे. डॉ. नायडू रुग्णालय, बाणेर कोविड सेंटर, लायगुडे दवाखाना, खेडेकर दवाखाना, सिंहगड हॉस्टेल कोंढवा आणि विमान नगर अशा सहा ठिकाणचे सेंटर सुरू आहे. बंद केलेल्या सेंटरवरील मनुष्यबळ आता हळूहळू त्या-त्या विभागांना पुन्हा पाठविण्यात येत आहे. हे मनुष्यबळ आपापल्या विभागात रुजू होत असल्याने त्या विभागाची कामे आता सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे.
----------
आजवर जवळपास ४०० अधिकारी-कर्मचारी आपापल्या विभागात रुजू झाले आहेत. यामध्ये बांधकाम विभागाचे ३० उप अभियंता, ड्रेनेज पाणीपुरवठा लचे २४ उप अभियंता आणि मिळकत कर विभागाच्या १५० अधिकारी-कर्मचारी यांचा समावेश आहे.