Corona virus : ते डॉक्टर आहेत, पण आम्ही भीतीवर दक्षतेने करतो मात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 01:18 PM2020-03-16T13:18:23+5:302020-03-16T13:27:16+5:30

कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालल्याने लोकांमध्ये घबराट निर्माण होऊ लागली आहे.

Corona virus : He is a doctor, but overcomes fear | Corona virus : ते डॉक्टर आहेत, पण आम्ही भीतीवर दक्षतेने करतो मात

Corona virus : ते डॉक्टर आहेत, पण आम्ही भीतीवर दक्षतेने करतो मात

Next
ठळक मुद्देनायडूत काम करणाऱ्या डॉक्टरच्या कुटुंबीयांच्या भावना : नातेवाईक घाबरलेलेशाळा, महाविद्यालये, उद्याने, मॉल, नाट्यगृह, चित्रपटगृह बंद

राजानंद मोरे - 
पुणे : ‘नायडू रुग्णालयात पती दररोज कोरोनाग्रस्त रुग्णांसोबत असतात... त्यांना मधुमेह, रक्तदाबाचाही त्रास आहे. त्यामुळे कोरोनाची लागण होण्याचा धोका इतरांपेक्षा अधिक... दररोज सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर घरी येईपर्यंत काळजी वाटतेच... थोडी चूकही महागात पडू शकते, याची जाणीव आहे. पण, ते डॉक्टर असल्याने पुरेशी दक्षता घेतात... त्यांना काही झाले तर आम्ही काय करणार, याची भीती वाटते. पण, त्यांना कर्तव्यापासून रोखू शकत नाही. या भीतीवर आम्ही पुरेशी दक्षता घेऊन मात करत आहोत,’ अशा शब्दांत नायडू रुग्णालयातील एका डॉक्टराच्या कुटुंबीयांनी आपली भावना व्यक्त केली.
कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालल्याने लोकांमध्ये घबराट निर्माण होऊ लागली आहे. राज्य शासन, तसेच स्थानिक प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. शाळा, महाविद्यालये, उद्याने, मॉल, नाट्यगृह, चित्रपटगृह बंद करण्यात आली आहेत. अनेक जण भीतीपोटी पुण्यातून आपल्या गावी परतत आहेत. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेले, तसेच नातेवाइकांपासून लोक दूर राहण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्यक्ष नायडू रुग्णालयात दररोज कोरोनाग्रस्त रुग्ण तसेच संशयितांना सामोरे जाणारे डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांमध्येही भीती आहे. कोरोनाची लागण होण्याची शक्यता या कर्मचाºयांसह त्यांच्या कुटुंबीयांनाही आहे. पण दक्षता हाच त्यावरील रामबाण उपाय असल्याची जाणीव प्रत्येकालाच आहे. 
याविषयी ‘लोकमत’ प्रतिनिधीशी एका डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्यांनी संवाद साधला. डॉक्टरांना स्वाइन फ्लूच्या वेळीही नायडू रुग्णालयामध्ये काम करण्याचा अनुभव असल्याचे सांगत त्यांच्या पत्नी म्हणाल्या, की नायडू रुग्णालयामध्ये विलगीकरण कक्ष सुरू झाल्यानंतर तिथे त्यांची नेमणूक झाली. सुरुवातीला संशयित रुग्ण येत होते. बहुतेक जणांना लागण झाली नसल्याचे स्पष्ट होत होते. पण कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळल्याने भीती वाढली. त्यानुसार रुग्णालयात ते काळजी घेतात. 
................
आता फोनवरच होते चौकशी....
कोरोनाची लागण झालेले रुग्ण सापडू लागल्याने आमच्या सोसायटीतील लोकही घाबरले आहेत; तसेच नातेवाईकही काळजी करतात. पती नायडू रुग्णालयात असल्याचे त्यांना माहिती आहे. त्यामुळे आता नातेवाईक किंवा सोसायटीतील लोक घरी येण्याचे टाळत आहेत. फोनवरूनच चौकशी करतात, असे डॉक्टरांच्या पत्नीने सांगितले. उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलीनेही आपल्या वडिलांच्या या कामाला सर्वांचा पाठिंबा असल्याचे सांगितले. ते नायडूमध्ये असल्याचा कसलाही त्रास होत नाही, असेही तिने स्पष्ट केले.
.........
आधी कर्तव्य, मग कुटुंब...
कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सर्वजण काळजी घेत आहेत. डॉक्टरांचे तर हे कर्तव्यच आहे. ही प्राथमिकता असली पाहिजे. नायडू रुग्णालयात जाणाऱ्या डॉक्टर मुलाची काळजी तर वाटते. त्यांना पुरेशी दक्षता घेण्याबाबत सांगितले आहे. तो ससूनमध्ये निवासी डॉक्टर असल्याने कधीतरी घरी येतो, असे एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
एका महिला डॉक्टरांचे कुटुंब मुंबईला आहे. पण, तिथूनही ते दररोज प्रकृतीची चौकशी करतात. आधी ते नायडू रुग्णालयात न जाण्याचा आग्रह करत होते. पण त्यांना समजावून सांगितल्यानंतर तयार झाले. पण तरीही त्यांना भीती वाटते, असे डॉक्टर म्हणाल्या.

Web Title: Corona virus : He is a doctor, but overcomes fear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.