Corona virus : कोरोनाला पायाबंद घालण्याकरिता बिबवेवाडी आणि हडपसरमध्ये पथदर्शी प्रकल्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 21:32 IST2020-07-16T21:31:37+5:302020-07-16T21:32:04+5:30
अधिकाधिक कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि अधिकाधिक स्क्रिनिंगमुळे लपलेले रुग्ण वेळेत निष्पन्न करून त्यांना इजि उपचार देणे शक्य होणार

Corona virus : कोरोनाला पायाबंद घालण्याकरिता बिबवेवाडी आणि हडपसरमध्ये पथदर्शी प्रकल्प
पुणे : कोरोनाची दिवसेंदिवस वाढत जाणारी रुग्णसंख्या लक्षात घेता या साथीला अटकाव करण्याकरिता पालिकेने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, स्वाब तपासणी, रॅपिड अँटिजेन किट तपासणी आणि वेळेत रुग्ण शोधन करण्यासाठी 'पथदर्शी प्रकल्प' सुरू केला आहे. या प्रकल्पासाठी बिबवेवाडी आणि हडपसर क्षेत्रीय कार्यालयांची निवड करण्यात आली आहे.
पालिका व पोलिसांमार्फत कोरोना संक्रमित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती दररोज घेतली जाते. त्यासाठी तांत्रिक पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकाद्वारे शोधलेल्या व्यक्तींचे तातडीने स्क्रिनिंग केले जाते. यापुढे निवडण्यात आलेल्या भागात या स्क्रिनिंगवर अधिक भर देण्यात येणार आहे. बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अप्पर इंदिरा नगर व हडपसर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत माळवाडी हा भाग पथदर्शी प्रकल्पासाठी निवडण्यात आला आहे. तांत्रिक पथकाद्वारे शोधलेल्या पिझिटिव्ह, निगेटिव्ह तसेच रुग्णांच्या संपर्कातील अति जोखमीचे आणि कमी जोखमीच्या व्यक्तींचे अधिकाधिक स्क्रिनिंग केले जाणार आहे. त्याची रुपरेषाही ठरविण्यात आली आहे. अधिकाधिक कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि अधिकाधिक स्क्रिनिंगमुळे लपलेले रुग्ण वेळेत निष्पन्न करून त्यांना इजि उपचार देणे शक्य होणार आहे. वेळेत उपचार मिळाल्याने मृत्युदर कमी होण्यासही मदत मिळणार आहे.
या पथदर्शी प्रकल्पाचे कामकाज व्यवस्थित चालण्याकरिता पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे यांच्या निगरानीखाली अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहे.
----
काय नेमकी रूपरेषा
१. सर्वप्रथम कार्यक्षेत्राची घरांची संख्या व लोकसंख्या निश्चित करून त्या भागात आढळून आलेल्या कोरोना रुग्णांपैकी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व पोलिसांच्या फॅक्ट रिपोर्टनुसार किती व्यक्तींचे सर्वेक्षण झाले व अद्यापही किती कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होणे बाकी आहे याचा दैनंदिन आढावा घेतला जाणार आहे.
२. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींपैकी लक्षणे असणारी व बहू व्याधी (कोमॉरबीड) लोकांची यादी करुन सर्वेक्षणाच्या ठिकाणीच निश्चित केलेल्या स्वाब कलेक्शन सेंटरवर रॅपिड अँटिजेन टेस्ट करून घेतली जाणार आहे.
३. या कार्यक्षेत्रात सर्वेक्षण व अन्य टिम्स मार्फत थर्मल स्क्रिनिंग आणि पल्स ऑक्सिमिटरद्वारे तपासणी करून त्यात उच्च तापमान व ऑक्सिजन लेव्हल कमी असणा-या रुग्णांची स्वाब कलेक्शन सेंटरवर ठिकाणी रपॉड अँटिजेन टेस्ट करून घेतली जाणार आहे.
४. सर्व टेस्ट निगेटिव्ह आलेल्या रुग्णांना मोबाईल रुग्णवाहिका दवाखान्यामार्फत व्हिटॅमिन व रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारी औषधे देण्यात येणार आहेत. तसेच रॅपिड अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना त्वरित कोविड केअर सेंटरमध्ये विलगिकरणात ठेवण्यात येणार आहे.
५. पुढील १५ दिवसात सर्व निगेटिव्ह काँटॅक्टचा पाठपुरावा करून लक्षणे आढळल्यास स्वाब तपासणी करून घेण्यात येणार आहे.
-----------
पथदर्शी प्रकल्पासाठी निवडण्यात आलेल्या भागाचा तपशील
क्षेत्रीय कार्यालय ठिकाण घरे लोकसंख्या कोविड रुग्ण
बिबवेवाडी अप्पर इंदिरानगर १,५०० ७,४९० १६५
हडपसर माळवाडी १,८०० ७२९६ ९६६२