Corona virus : उरुळी कांचन येथील कोरोनाबाधित महिलेवर उपचार करणारे डॉक्टर आणि नर्सचा रिपोर्ट निगेटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 19:24 IST2020-05-05T19:22:50+5:302020-05-05T19:24:25+5:30
लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू असताना, उपचार करणारे वरील तीन ही जण कोरोनाबाधित

Corona virus : उरुळी कांचन येथील कोरोनाबाधित महिलेवर उपचार करणारे डॉक्टर आणि नर्सचा रिपोर्ट निगेटिव्ह
उरुळी कांचन : उरुळी कांचन येथील कोरोनाबाधित महिलेवर लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात उपचार करणारे एक डॉक्टर व दोन नर्स अशा तीनही जणांची दुसरी कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली आहे. संबंधित महिलेवर चौदा दिवसापूर्वी लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू असताना, उपचार करणारे वरील तीन ही जण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले होते.
दरम्यान डॉक्टर व दोन नर्स यांची दुसरी टेस्ट रात्री करण्यात आली असता तिघांची टेस्ट निगेटिव्ह आल्याने वरील या तीन जणांना मंगळवारी(दि.५)ला घरी सोडण्यात आले.
थोड्या दिवसापूर्वी उरुळीतील कोरोना बाधित महिलाही कोरोनामुक्त होऊन घरी आल्याने पूर्व हवेलीतील आठपैकी चार रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. तसेच कदमवाकवस्ती हद्दीतील कवडीपाट येथील मृत पावलेल्या कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या दोन व सोमवारी नव्याने मिळालेल्या अश्या तिघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.डी. जे.जाधव म्हणाले, आठपैकी चार कोरोना मुक्त झाल्याने नागरिकांनी निष्काळजीपणा न करता घराबाहेर पडू नये.जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क वापरावे.आणि वेळोवेळी सॅनिटायझरने हात साफ करावे.
उरुळी कांचन येथील डॉक्टर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी आल्यावर आश्रम रोडवरील नागरिकांनी व मित्रपरिवाराने टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत करुन कोरोनावर यशस्वी मात केल्याबद्दल आनंद व्यक्त केला.