Corona virus : पुणेकरांनो सावधान.! गेल्या काही दिवसांत पुण्यात मुंबईपेक्षा अधिक कोरोनाबाधित
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 18:32 IST2020-07-17T18:14:51+5:302020-07-17T18:32:04+5:30
लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता आणल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी,रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली होती..

Corona virus : पुणेकरांनो सावधान.! गेल्या काही दिवसांत पुण्यात मुंबईपेक्षा अधिक कोरोनाबाधित
पुणे : कोरोना नियंत्रणासाठी सरकारी, प्रशासकीय व वैद्यकीय पातळीवर अनेक पावले उचलली जात आहे. पण वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येला अटकाव घालण्यात अजूनतरी यश आलेले नाही.गेल्या तीन दिवसांत पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही मुंबईपेक्षा अधिक आहे. ही बाब निश्चितच पुणेकर व प्रशासनाची चिंता वाढवणारी आहे.
देशभरात कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केल्यानंतर मार्च महिन्यात पुणे शहरात पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर रुग्ण वाढीचा आलेख हा चढताच राहिला आहे. या दरम्यान केंद्र सरकार व राज्य सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे ही संख्या कुठेतरी नियंत्रणात होती. मात्र, 1 जून पासून राज्य सरकार व जिल्हाधिकारी प्रशासनाने लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता आणल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी,रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली होती.त्यामुळे फिजिकल सुरक्षितता धोक्यात आली. नागरिकांकडुन नियमांचे सातत्याने उल्लंघन होऊ लागले. त्यामुळे पुन्हा प्रशासनाला पुणे व पिंपरी शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करावा लागला.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून पुण्यात तळ ठोकून आहे.यादरम्यान त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत,महापालिका प्रशासन यांच्यासोबत बैठकांचा धडाका लावला आहे. तसेच वेळप्रसंगी प्रशासनाला कठोर निर्णय घेत कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी कंबर कसली आहे.
पुण्यात दररोज १५०० पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत तर मुंबईत दिवसागणिक १२०० ते १३०० रुग्ण सापडत आहे.गुरुवारी पुणे शहरात तर १८८२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.मुंबईत गुरुवारी १४९८ रुग्ण होते. आजमितीला पुणे शहराची रुग्णसंख्या ३१ हजार ८८४ इतकी आहे. आणि ९०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईत बाधितांची संख्या ९७ हजारांच्या वर गेली असून मृतांची संख्या साडे पाच हजारांच्यावर आहे. त्याच दरम्यान महापालिकेकडून कोरोनाविरुद्धच्या लढाईत विविध उपाययोजना करण्यात येत होत्या.शहरातील स्वाब टेस्ट वाढवण्यात आल्या होत्या.