Corona virus : बाणेर येथील कोविड हॉस्पिटलमध्ये 'जम्बो'ची पुनरावृत्ती टळली,वेळीच बदलले व्यवस्थापन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 12:13 PM2020-09-10T12:13:39+5:302020-09-10T12:14:55+5:30

कोविड हॉस्पिटलचे काम करण्यास कुचकामी ठरलेल्या यंत्रणेकडची जबाबदारी काढली.

Corona virus : Avoid recurrence of Jumbo Hospital at Kovid Hospital in Baner, changed management in time | Corona virus : बाणेर येथील कोविड हॉस्पिटलमध्ये 'जम्बो'ची पुनरावृत्ती टळली,वेळीच बदलले व्यवस्थापन

Corona virus : बाणेर येथील कोविड हॉस्पिटलमध्ये 'जम्बो'ची पुनरावृत्ती टळली,वेळीच बदलले व्यवस्थापन

Next
ठळक मुद्देटप्प्या टप्प्याने यंत्रणा सक्षम करूनच नवीन रूग्णांना प्रवेश दिला जाणार

नीलेश राऊत- 

पुणे : पुणे महापालिकेच्यावतीने जम्बो हॉस्पिटलच्या धर्तीवर तीनशेहून अधिक बेडचे सीएसआर फंडातून उभारलेल्या बाणेर-बालेवाडी येथील ‘डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल’ मध्ये, वेळीच खबरदारी घेतल्याने जम्बो हॉस्पिटलची पुनरावृत्ती टळली आहे. भाकरे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्यवस्थापन कोविड हॉस्पिटलचे काम करण्यास कुचकामी ठरल्याने त्यांच्याकडून महापालिकेने काम काढून घेतले असून, डॉ.भिसे  यांच्याकडे या हॉस्पिटलची जबाबदारी दिली आहे.  

कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन, मोठा गाजा वाजा करून ‘पीएमआरडी’च्या माध्यमातून जम्बो हॉस्पिटल उभारण्यात आले. पण त्याचा फोलपणा काही दिवसातच समोर आला आणि नव्याने या हॉस्पिटलमध्ये महापालिकेला यंत्रणांचे सक्षमीकरण करण्याचे काम करावे लागले. हीच परिस्थिती बाणेर येथील कोविड हॉस्पिटलमध्येही उद्भवण्यास सुरूवात झाली होती.२८ आॅगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांच्या उपस्थितीत या हॉस्पिटलचे उद्घाटन झाले.त्यावेळी पालिकेच्या सर्व हॉस्पिटलमध्ये तथा जम्बो हॉस्पिटलपेक्षाही चांगले असे हे कोविड हॉस्पिटल आहे असे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले.

परंतु, दहा दिवस उलटले तरी, या हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाची जबाबदारी दिलेल्या भाकरे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्यवस्थापन येथे वैद्यकीय सुविधा देण्यास पूर्णत: अयशस्वी ठरले.दोन दिवसांपूर्वीच याची जाणीव महापालिकेला झाली आणि जम्बो हॉस्पिटलची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वेळीच खबरदारी घेऊन, नवीन यंत्रणेच्या नियुक्तीचे काम महापालिकेने चालू केले. त्यातच डॉ़भाकरे व्यवस्थापनाकडूनही मंगळवारी रात्री मुनष्यबळाअभावी आम्ही हे काम करू शकत नाही असे लेखी कळविण्यात आले. त्यामुळे दाखल रूग्णांना योग्य उपचार मिळावे यासाठी हे काम डॉ.भिसे यांच्याकडे देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली.तर महापालिकेने स्वत:चे डॉक्टर याठिकाणी नियुक्त केले.

------------------------------

प्रथम यंत्रणा सक्षम करू नंतरच प्रवेश देऊ

जम्बो हॉस्पिटल सुरू करण्याची घाई अंगलट आल्याने, पुणे महापालिकेने बाणेर येथील कोविड हॉस्पिटलमधील नवीन प्रवेश सध्या थांबविले आहेत. डॉ.भाकरे व्यवस्थापनाकडून हे काम काढून, ते जम्बो हॉस्पिटलमधील ‘आयसीयू’ विभाग सांभाळणाऱ्या डॉ.भिसे यांच्याकडे देण्यात आले आहे.  येत्या दोन दिवसात डॉ.भाकरे यांच्याकडे महापालिकेने दिलेल्या औषधांचा साठा परत घेऊन सर्व औषधांसह इतर कामकाज डॉ.भिसे यांच्याकडे सूपर्त करण्यात येईल. त्यामुळे सध्या तरी येथे नवीन रूग्णांना प्रवेश दिला जाणार नसून, टप्प्या टप्प्याने यंत्रणा सक्षम करूनच नवीन रूग्णांना प्रवेश दिला जाईल, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांनी लोकमतशी बोलताना दिली.

------------------

५५ रूग्ण, १ व्हेंटिलेटरवर 

 ३१४ बेडची क्षमता असलेल्या या हॉस्पिटलचा प्रारंभ दहा दिवसांपूर्वी झाला असला तरी, सध्या हॉस्पिटलमध्ये ५५ रूग्ण असून, यापैकी १७ जण ‘आयसीयू’मध्ये असून, उर्वरित रूग्ण आॅक्सिजन बेडवर आहेत. यापैकी १ जण व्हेंटिलेटरवर असून, ३ गंभीर आहेत़ वैद्यकीय सेवा देण्यास मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकत नाही हे वेळीच लक्षात आल्याने, येथे नवीन प्रवेश बंद केले आहेत.तर आहे त्या रूग्णांवर उपचारासाठी महापालिकेने निकमार व बालेवाडी स्टेडियम तथा वॉर्ड आॅफिस स्तरावरील ८ डॉक्टर नियुक्त केले आहेत.

---------------

Web Title: Corona virus : Avoid recurrence of Jumbo Hospital at Kovid Hospital in Baner, changed management in time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.