Corona virus : शहरातील हॉस्पिटलकडून मिळणाऱ्या माहितीची शहानिशा करण्यासाठी १५ अधिकाऱ्यांची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 20:56 IST2020-07-08T20:55:29+5:302020-07-08T20:56:38+5:30
या नवीन यंत्रणेमुळे खाजगी हॉस्पिटलला आपल्याकडील बेडस् उपलब्ध क्षमता लपविता येणार नसून, महापालिकेलाही हॉस्पिटलमधील खरी माहिती मिळू शकणार आहे.

Corona virus : शहरातील हॉस्पिटलकडून मिळणाऱ्या माहितीची शहानिशा करण्यासाठी १५ अधिकाऱ्यांची नियुक्ती
पुणे : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे पुणे महापालिका प्रशासनाने शहरातील खासगी हॉस्पिटलमधील बेडही कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित हॉस्पिटलमधील उपलब्ध बेडची माहितीची शहानिशा करण्यासाठी प्रशासकीय सेवेतील १५ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी जारी करून, लेखापरिक्षक विभाग, कृषी विभाग, समाज कल्याण विभाग व पीएमपीएमएलमधील १५ अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. हे अधिकारी आप-आपल्या कार्यालयातील दोन कर्मचाºयांसह नियुक्त केलेल्या हॉस्पिटलमधील उपलब्ध बेडस्, कोविड-१९ रूग्णांवर उपचारासाठी वापरात येणारे बेड, व्हेंटिलेटर, आय़सी़यू़ आॅक्सिजन बेड यांची हॉस्पिटलने दिलेली माहिती व प्रत्यक्षातील माहिती याची दररोज सहानिशा करणार आहेत. तसेच त्याबाबतचा अहवालही महापालिकेला दररोज सादर करणार आहेत.
सदर समन्वय अधिकाऱ्यांनी आपल्या कायार्यालातील दोन कर्मचारी नियुक्त करून, नेमून दिलेल्या हॉस्पिटलमध्ये आपला कर्मचारी दिवसभर उपस्थित राहिल याची खबरदारी घ्यावी व स्वत:ही दिवसातून एकदा या हॉस्पिटलमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घ्यावयाचा आहे. हे सर्व काम मुख्य नियंत्रण अधिकारी पवनिक कौर (आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था) यांच्या देखरेखीखाली होणार आहे.
या नवीन यंत्रणेमुळे खाजगी हॉस्पिटलला आपल्याकडील बेडस् उपलब्ध क्षमता लपविता येणार नसून, महापालिकेलाही या हॉस्पिटलमधील खरी माहिती मिळू शकणार आहे. तसेच खोटी माहिती देणाऱ्या खासगी हॉस्पिटल यांच्यावरही यामुळे धाक निर्माण होऊन, कोविड-१९ च्या रूग्णांची उपचारासाठीची धावपळ थांबली जाणार आहे.