Corona Vaccination Pune : सलग चौथ्या दिवशी पुणे शहरातील सर्व लसीकरण केंद्र राहणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 21:40 IST2021-05-03T21:39:21+5:302021-05-03T21:40:26+5:30
राज्य शासनाकडून महापालिकेला सोमवारी रात्रीपर्यंत लस उपलब्ध होईल असा अंदाज होता.

Corona Vaccination Pune : सलग चौथ्या दिवशी पुणे शहरातील सर्व लसीकरण केंद्र राहणार बंद
पुणे : राज्य शासनाकडून महापालिकेला सोमवारी रात्रीपर्यंत लस उपलब्ध होईल असा अंदाज होता. मात्र, आजही लस उपलब्ध न झाल्याने, मंगळवार (दि.४)मे रोजीही शहरातील सर्व लसीकरण केंद्र बंद राहणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे.
दरम्यान,१८ ते ४४ वयोगटातील वर्गाला महापालिकेच्या राजीव गांधी रूग्णालय व कमला नेहरू रूग्णालय येथे लसीकरण सुरू राहणार आहे. कोविन अॅपवर नोंदणी केलेल्यांना व लसीकरणाची विहित वेळ मिळालेल्यांनाच येथे लसीकरण करण्यात येणार आहे. ऐनवेळी आलेल्या व्यक्तींना लसीकरण मात्र उपलब्ध राहणार नाही.या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी ३५० जणांना लसीकरण होईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १ मे रोजी म्हणजे १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी राजीव गांधी रूग्णालयात ‘कोविन अॅप’वर नोंदणी केलेल्या व नमूद केलेल्या वेळेत आलेल्या केवळ १८ जणांना तर कमला नेहरू रूग्णालयात २८ जणांनाच लसीकरण करण्यात आले.कोविन अॅपमध्ये नोंदणी करूनही पहिल्या दिवशी अनेकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली.दरम्यान ३५० लस प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असतानाही कोविन अॅप नोंदणी बंधनकारक केल्याने इतरांना लस देता आली नाही.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसात १८ ते ४४ वयोगटातील १ हजार ९१ जणांना लसीकरण करण्यात आले असून, २ मे रोजी कमला नेहरू येथे १९४ तर राजीव गांधी रूग्णालय येथे १८६ जणांना तर ३ मे रोजी कमला नेहरू येथे ३३१ जणांना व राजीव गांधी रूग्णालयात ३३४ जणांना लस देण्यात आली.
---------------------------------