Corona Vaccination Pune : पुणेकरांच्या नशिबी उद्याही लसीकरण नाहीच! लसींअभावी सर्व केंद्र राहणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 20:55 IST2021-05-17T20:54:47+5:302021-05-17T20:55:11+5:30
राज्य सरकारकडून सोमवारी रात्री उशिरापर्यंत पोहचलीच नाही.

Corona Vaccination Pune : पुणेकरांच्या नशिबी उद्याही लसीकरण नाहीच! लसींअभावी सर्व केंद्र राहणार बंद
पुणे : राज्य शासनाकडून सोमवारी रात्री उशिरापर्यंत लस प्राप्त न झाल्याने उद्याही ( दि. १८) शहरातील सर्व लसीकरण केंद्र पूर्णपणे बंद राहणार आहेत. असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील लसीकरण ठप्प असून रविवारी फक्त १५ केंद्र सुरु होते.
पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, राज्य शासनाकडून गुरूवारी रात्री कोव्हॅक्सिन लस पुरवठा झाल्यानंतर आजपर्यंत नव्याने कुठल्याही लसचा पुरवठा करण्यात आलेला नाही. परिणामी मंगळवारीही सर्व लसीकरण केंद्र लसअभावी बंद राहणार आहेत. यामुळे आता केवळ प्रतिक्षा करण्याशिवाय कुठलाच पर्याय महापालिकेकडे उरलेला नाही. दरम्यान, ज्या नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला गेला आहे, त्यांना तरी विहित वेळेत लसीचा दुसरा डोस मिळणे गरजेचे असून, ही लस कधी येणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.
पुणे शहरातील ११९ लसीकरण केंद्रांवर गेल्या दोन दिवसांपासून शुकशुकाट आहे. स्थानिक माननीय व त्यांचे कार्यकर्ते यांच्याकडे येणाºया नागरिकांना लस नाही, आल्यावर कळवू हे उत्तर देण्याशिवाय पर्याय उरला नाही़ तर महापालिकेच्या आरोग्य विभागाचे एकामागोमाग एक फोन राज्याच्या आरोग्य विभागाला जात असून, लस घेण्यसाठी गाडी कधी पाठवू याबाबत विचारणा होत आहे़ मात्र राज्य शासनाकडून लससाठा शिल्लक नसल्याने लस तरी देणार कुठून असा प्रतिप्रश्न करून लस आली की कळवू असेच उत्तर मिळत आहे़
या सर्व घडामोडीत मात्र सर्वसामान्य नागरिक की, ज्याला कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस शासनाच्या एसओपीनुसार (मार्गदर्शक सूचनांनुसार) २८ दिवसांनी घ्यावा लागणार आहे. अशा शहरातील २३ हजार ८४३ जणांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस वेळेत मिळणे आवश्यक झाले आहे.यामध्ये बहुतांशी जणांचे पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्णही झाले असून, दहा बारा दिवस मागेपुढे या भरोवश्यावर अनेक जण लसीची वाट पाहत आहेत. यात २ हजार ५१३ हेल्थ वर्कर, १ हजार ९८३ फ्रं ट लाईन वर्कर, १० हजार ८२५ जण४५ ते ५९ या वयोगटातील नागरिक यांचा समावेश आहे.
-----------------
ज्येष्ठ नागरिकांना तरी लस मिळणार का ?
शहरात आजपर्यंत ६० वर्षांवरील ३८ हजार ६६२ ज्येष्ठ नागरिकांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस दिला गेला आहे. यापैकी २८ हजार ८ जणांना अद्यापही दुसरा डोस मिळालेला नाही. त्यामुळे या ज्येष्ठ नागरिकांकडून वांरवार महापालिकेच्या आरोग्य विभागाला फोन करून दुसरा डोस कधी मिळणार याबाबत विचारणा होत आहे. परंतु, शासनाकडूनच कोव्हॅक्सिन लसचा पुरवठा कधी येईल याबाबत कुठलीच शाश्वती सध्या तरी नसल्याने सर्वच यंत्रणांची कुचंबना झाली आहे.
---------------------------