Lokmat Impact: वादग्रस्त होर्डिंग पुन्हा जमीनदोस्त; लोकमतचा पाठपुरावा अन् महापालिकेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 11:44 IST2025-03-04T11:43:29+5:302025-03-04T11:44:55+5:30
होर्डिंगला राजकीय व अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याने या होर्डींगचा नेमका 'आका' कोण असा सवाल लोकमतने उपस्थित केला होता

Lokmat Impact: वादग्रस्त होर्डिंग पुन्हा जमीनदोस्त; लोकमतचा पाठपुरावा अन् महापालिकेची कारवाई
हिरा सरवदे
पुणे: टिळक चौकातील संभाजी पोलिस चौकीच्या पाठीमागे उभारण्यात येत असलेल्या वादग्रस्त होर्डिंगला सांगाडा महापालिकेने मंगळवारी सकाळी पुन्हा पाडला. यासंदर्भात दैनिक लोकमतने सातत्याने पाठपुरावा करत प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडले.
महापालिकेच्या कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने दीड वर्षापूर्वी परवानग्या दिल्याने टिळक चौकातील संभाजी पोलिस चौकीच्या मागच्या बाजूला तीन होर्डिंग एकत्र करून एकच भले मोठे होर्डिंग उभारले होते. यावर प्रसार माध्यमांनी प्रकाश टाकल्यानंतर तत्कालीन महापालिका आयुक्तांनी क्षेत्रीय कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. त्यानंतर, होर्डिंग व्यावसायिकाने सलग होर्डिंग वेगवेगळे करून तीन होर्डिंग केले होते. कारवाई होण्याची शक्यता लक्षात घेऊन होर्डिंग मालकाने कारवाईस स्थगिती मिळविण्यासाठी महापालिका न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने कारवाईस स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर महापालिकेने फेब्रुवारी २०२४ मध्ये हे होर्डिंग पाडून टाकले होते.
या घटनेस एक वर्षाचा कालावधी गेल्यानंतर, त्याच होर्डिंग मालकाकडून आता पुन्हा याच ठिकाणी होर्डिंग उभारणी करण्याचे काम सुरू आहे. महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी शुक्रवारी परवानगीसंदर्भात चौकशी करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना पोलिसांच्या समोर दमदाटी करून हुसकावून लावण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर दादागिरी करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी दिला होता. त्यानंतरही पूर्वी कापलेल्या लोखंडी फाउंडेशनवरच नट-बोल्ट च्या साहाय्याने सांगाडा उभारण्यात आला. या होर्डिंगला राजकीय व अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याने या होर्डींगचा नेमका 'आका' कोण असा सवाल लोकमतने उपस्थित केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेने अखेर मंगळवारी सकाळी या होर्डींगवर पुन्हा कारवाई करत ते जमिनदोस्त केले.