पुणे शहरातील ‘कन्टेन्मेंट झोन’मध्ये 18 तारखेनंतर बदल होणार ; खासगी कार्यालये सुरू करण्याचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 15:23 IST2020-05-16T15:22:02+5:302020-05-16T15:23:43+5:30
प्रतिबंधित क्षेत्रातील ज्या भागातली रुग्णसंख्या कमी झाली आहे, असा भाग प्रतिबंधित क्षेत्रातून वगळण्यात येईल.

पुणे शहरातील ‘कन्टेन्मेंट झोन’मध्ये 18 तारखेनंतर बदल होणार ; खासगी कार्यालये सुरू करण्याचे संकेत
पुणे : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येचा आढावा घेऊन सध्या शहरात असलेल्या 69 कन्टेन्मेंट झोनमध्ये (प्रतिबंधित क्षेत्रांत) बदल करण्याचे संकेत पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले.
प्रतिबंधित क्षेत्रातील ज्या भागातली रुग्णसंख्या कमी झाली आहे, असा भाग प्रतिबंधित क्षेत्रातून वगळण्यात येईल. तसेच ज्या भागात नव्याने रुग्ण आढळत आहेत, अशा ठिकाणी सूक्ष्म कन्टेन्मेंट झोन नव्याने निर्माण केले जाऊ शकतात, असे गायकवाड यांनी सांगितले. ते शनिवारी (दि. 16 मे) पत्रकारांशी बोलत होते.
पुण्याचा मृत्यूदर 14 टक्क्यांवरून 5.18 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात प्रशासनाला यश; अर्थात ही टक्केवारी अजूनही राज्य आणि राष्ट्रीय टक्केवारीपेक्षा जास्त आहे.
मेअखेरपर्यंत शहरात 9,600 पॉझिटीव्ह रुग्ण आढळतील, या अंदाजानुसार प्रशासनाचे नियोजन चालू होते. आता परिस्थिती बदलली असून मेअखेरपर्यंत जास्तीत जास्त 5,000 कोरोनाबाधित आढळतील, अशी शक्यता आहे.
18 तारखेपासून शहरात जास्तीत जास्त शिथिलता आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असेल. त्यानुसार खासगी कार्यालयांना परवानगी, सरकारी कार्यालयांमध्ये 100 टक्के मनुष्यबळ उपस्थिती यावर भर दिला जाईल. कन्टेन्मेंट क्षेत्रातदेखील रोजगार आणि जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता वाढविण्यावर प्रशासनाचा भर असेल.