पुणे : पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना ११ एप्रिल रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास धायरी येथील गजानन संकुलमध्ये घडली. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीविरोधात नांदेड सिटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मल्लिकार्जुन मऱ्याप्पा चलवादी (२६, रा. धायरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी भीमाप्पा चौडप्पा चलवादी (५३, रा. मुंढवा) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार भीमाप्पा यांच्या मुलीचे आणि मल्लिकार्जुन यांचे काही महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर आरोपी पती मल्लिकार्जुनने पत्नीला त्रास देण्यास सुरुवात केली. सततच्या त्रासामुळे आणि होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून भीमाप्पा यांच्या मुलीने ११ एप्रिल रोजी घरातील पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांना आरोपी मल्लिकार्जुन विरोधात रविवारी (दि. १३) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक स्वप्नाली गायकवाड करत आहेत.