पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे हद्दपार करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर कटकारस्थान : शिवाजीराव आढळराव पाटील यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 12:05 IST2025-01-16T12:04:30+5:302025-01-16T12:05:38+5:30
- प्रस्तावित मार्गावरच हा प्रकल्प व्हावा, यासाठी जनआंदोलन उभारणार

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे हद्दपार करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर कटकारस्थान : शिवाजीराव आढळराव पाटील यांचा आरोप
राजगुरुनगर : पुणे-नाशिक ही देशभरातील पहिली हाय स्पीड रेल्व प्रास्तावित होती. या रेल्वे मार्गामुळे पुणे व नाशिक ही दोन्ही महत्त्वाची शहरे जोडली जाणार आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कृषी व औद्योगिक मालाच्या वाहतुकीत मोठी चालना मिळेल. मात्र, या प्रकल्पाला जुन्नर तालुक्यातील खोडद येथील जीएमआरटी प्रकल्प अडथळा ठरत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. प्रस्तावित मार्ग बदलून अहमदनगर मार्गे रेल्वे प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे.
खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात हा मार्ग होऊ नये, यासाठी वरिष्ठ स्तरावर कटकारस्थान शिजवले जात आहे. असा खळबळजनक आरोप करून ज्या मार्गावर रेल्वे प्रकल्प प्रस्तावित आला. त्याच मार्गाने हायस्पीड रेल्वे प्रकल्प व्हावा, यासाठी जनआंदोलन उभारणार असल्याचे म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषेदत सांगितले.
पुणे - नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प होताना तो उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात तसेच पुढे संगमनेर मार्गे सिन्नर, नाशिक असा प्रस्तावित करण्यात आला आहे. जीएमआरटी प्रकल्प बाधित होत असेल, तर नियोजित मार्गात कोणताही बदल न करता त्यावर योग्य तोडगा काढून रेल्व प्रकल्प पूर्णत्वाकडे न्यावा, या परिसरात काही अंतर दूरवरून रेल्वे मार्ग होऊ शकतो. असेही ते म्हणाले. पहिल्या सर्वेक्षणात पुणे नाशिक महामार्गाच्या पश्चिम बाजूने रेल्वेमार्ग प्रस्तावित होता.या सर्व प्रक्रियेत खोडद (ता. जुन्नर) येथील जीएमआरटीचा प्रश्न कुठेही उपस्थित झाला नव्हता. कारण, या मार्गापासून जीएमआरटी दुर आहे. नंतर पूर्व बाजूने मार्ग निश्चित करण्यात आला. संपादन झाले. शेतकऱ्यांना जवळपास चारशे कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली. आत्ता जीएमआरटीवरुन हरकत घेतली जात असेल, ती एक पळवाट शोधली आहे, असे समजावे लागेल.
हायस्पीड रेल्वे झाल्यास खेड, आंबेगाव आणि जुन्नर या पुणे जिल्ह्यातील तालुक्याच्या शेती विकासाला चालना मिळणार आहे. पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगांव, शिक्रापूर या औद्योगिक वसाहतीची नाशिक औद्योगिकीकरणाशी देवाणघेवाण होणार आहे. रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे हायस्पीड किंवा सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प मूळ प्रस्तावित मार्गावरच व्हावा, अशी येथील जनतेची आग्रही मागणी आहे. त्यासाठी मोठे जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचा इशारा आढळराव पाटील यांनी दिला.