काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार शरद रणपिसे यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 05:07 PM2021-09-23T17:07:25+5:302021-09-23T17:08:08+5:30

हृद्यविकाराचा त्रास झाल्याने त्यांना पंधरा दिवसांपूर्वी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते

Congress MLA Sharad Ranapise passes away | काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार शरद रणपिसे यांचं निधन

काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार शरद रणपिसे यांचं निधन

googlenewsNext
ठळक मुद्देपर्वती विधानसभा मतदार संघातून रणपिसे दोन वेळा काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले

पुणे : काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार शरद रणपिसे यांचे गुरुवारी दुपारी३ वाजता ह्रदयविकाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. ह्रदयविकाराचा त्रास झाल्याने त्यांना पंधरा दिवसांपूर्वी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठे बंधू राजू तसेच अन्य परिवार आहे. स्वतः शरद रणपिसे अविवाहीत होते.

पर्वती विधानसभा मतदार संघातून रणपिसे दोन वेळा (१९८५ ते १९९० व १९९० ते १९९५) काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. त्याआधी ते पुणे महापालिकेत (१९८० ते १९८५) नगरसेवक म्हणून कार्यरत होते.  त्यानंतर पक्षाने त्यांना विधानपरिषदेवर तीन वेळा संधी दिली. सध्या ते काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते होते.  अतीशय ऋजू स्वभावाचे नेते म्हणून रणपिसे सर्व पक्षात परिचित होते. 

काँग्रेसचे निष्ठावान म्हणून ते ओळखले जात. पुण्यात काँग्रेसची राजकीय स्थिती अवघड होत असतानाही पक्षाच्या जून्या कार्यकर्त्यांची एक फळी त्यांनी नेटाने टिकवून ठेवली होती. अलीकडच्या काळात प्रक्रुती अस्वाथ्यामुळे त्यांनी शहरातील संपर्क कमी केला होता. तरीही काँग्रेस भवनमधील कार्यक्रमांना ते आवर्जून ऊपस्थित रहात. 

त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे समजताच माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार उल्हास पवार तसेच पश्चिम महाराष्ट्र समन्वयक संजय बालगुडे, शहर सरचिटणीस रमेश अय्यर यांनी कमला नेहरू ऊद्यानासमोरील रूग्णालयात जाऊन रणपिसे यांचे भाऊ राजू यांची भेट घेतली. पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीसाठी म्हणून पुण्यातील बहुतांश पदाधिकारी मुंबईत आहेत. शहराध्यक्ष रमेश.बागवे, माजी आमदार मोहन जोशी,अँड अभय छाजेड हे सर्वजण मुंबईत आहेत.

प्रतिभा पाटील यांच्याबरोबर रणपिसे यांचा स्नेह 

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याबरोबर रणपिसे यांचा स्नेह होता. पुण्यातच स्थायिक असलेल्या पाटील यांंनी बुधवारी दुपारी रूग्णालयात येऊन रणपिसे यांची भेट घेतली. शरद माझा धाकटा भाऊ आहे त्याला लवकर बरे करा असे डॉक्टरांंना सांगत पाटील यांनी रूग्णालयात अर्धातास रणपिसे यांच्यासमवेत व्यतीत केला असे नगरसेवक अविनाश साळवे यांनी सांगितले.

 माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर व रणपिसे यांची महाविद्यालयीन वयापासून घनिष्ट मैत्री होती. दोघेही काँग्रेसचे काम करत. त्यांना पदेही मिळाली. फुले आंबेडकर अशीच त्यांची ओळख काँग्रेसमध्ये त्या काळात होती. अतिशय जवळचा मित्र मी गमावला, हे दु:ख शब्दात व्यक्त करणे अवघड आहे अशी भावना शिवरकर यांनी व्यक्त केली.  उद्या 11 वाजता कोरेगावपार्क स्मशान भूमी येथे  मा आ, शरद रणपिसे त्यांच्या पार्थिवा वर अंत्यसंस्कार होणार आहेत. 

Web Title: Congress MLA Sharad Ranapise passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.