सर्व प्रभागांत स्वबळावर निवडणूक लढण्याची काँग्रेसची तयारी; काँग्रेस शहराध्यक्षांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 14:03 IST2025-12-12T14:03:41+5:302025-12-12T14:03:53+5:30
वरिष्ठांनी आदेश दिला तरच आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाऊ, अन्यथा स्वबळावर निवडणूक लढू

सर्व प्रभागांत स्वबळावर निवडणूक लढण्याची काँग्रेसची तयारी; काँग्रेस शहराध्यक्षांची माहिती
पुणे : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून प्रभागनिहाय बैठकांवर भर देऊन अर्जही वाटप सुरू करण्यात आले आहे. महापालिकेच्या सर्व प्रभागात स्वबळावर निवडणूक लढण्याची आम्ही तयारी केली आहे. वरिष्ठांनी आदेश दिला तरच आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाऊ, अन्यथा स्वबळावर निवडणूक लढू, अशी माहिती काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिली.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आतापर्यंत केलेल्या तयारीची माहिती देण्यासाठी गुरुवारी काँग्रेस भवनमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते. यावेळी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, ॲड. अभय छाजेड, गोपाळ तिवारी, संजय बालगुडे, दीप्ती चवधरी, कमल व्यवहारे, लता राजगुरू, अविनाश बागवे, संग्राम खोपडे उपस्थित होते.
काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्यांनी आतापर्यंत २११ अर्ज नेले असून अर्ज जमा करण्याची मुदत १३ डिसेंबरपर्यंत आहे. आम्ही घेतलेल्या प्रभागनिहाय बैठकांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. वेगवेगळ्या समित्या स्थापन करून त्यानुसार निवडणुकीच्या कामाला वेग दिला आहे. काँग्रेसमध्ये सामूहिक नेतृत्व असून प्रत्येक ज्येष्ठ नेत्याकडे विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. जिंकून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. स्वबळावर निवडणूक लढविण्याची आमची तयारी आहे. मात्र, प्रदेश समिती आघाडीबाबत निर्णय घेतल्यास त्या निर्णयाचे आम्ही पालन करू, असे शिंदे म्हणाले. तर मतदार यादीतील दुबार नावे, मतदारांची नावे, दुसऱ्या प्रभागात जाणे किंवा आपल्या प्रभागात येणे, अशा अनेक प्रकारांद्वारे त्रुटी मतदार याद्यांमध्ये आहे, असा आरोप अविनाश बागवे यांनी यावेळी केला.
पालिकेच्या माध्यमातून भाजप निवडणुकीसाठी निधी उभारतो : शिंदे
पालिकेकडून प्रभाग रचनेपासून ते मतदार याद्यांबाबत प्रचंड गोंधळ सुरू आहे. भाजप महापालिकेच्या माध्यमातून निवडणुकीसाठी निधी उभारत आहे. मोठे व धोरणात्मक निर्णय नवीन सभागृह घेईल, मात्र भाजपला निवडणुकीसाठी निधी मिळावा, यासाठी अधिकाऱ्यांच्या बदल्या, वृक्ष गणनेच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च केला जात आहे. महापालिका हा निधी भाजपला निवडणुकीसाठी देत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला.