काँग्रेसला खुपतेय भाजपाची सलगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2016 01:43 IST2016-02-16T01:43:43+5:302016-02-16T01:43:43+5:30
महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्षाबरोबर जवळीक करीत आहे. पालिकेच्या सत्तेतील त्यांचा सहकारी असलेला काँग्रेस पक्ष याचा संबंध

काँग्रेसला खुपतेय भाजपाची सलगी
पुणे : महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्षाबरोबर जवळीक करीत आहे. पालिकेच्या सत्तेतील त्यांचा सहकारी असलेला काँग्रेस पक्ष याचा संबंध राज्य सरकारकडून होत असलेल्या राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांच्या सत्ताकाळातील निर्णयांच्या चौकशीबरोबर जोडत आहे. पालिकेतील उपमहापौर, तसेच स्थायी समितीचे अध्यक्षपद ही दोन सत्तापदे काँग्रेसला या वर्षी राष्ट्रवादीकडून अपेक्षित असून, त्यांच्या भाजपाबरोबरच्या जवळीकेने त्यापुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
स्मार्ट सिटी या केंद्र सरकारच्या योजनेचे समर्थन करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबरोबरच आता ज्येष्ठ नेते शरद पवार हेही मैदानात उतरले आहेत. स्मार्ट सिटीमधील स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याच्या तरतुदीला काँग्रेसचा तीव्र विरोध आहे. राष्ट्रवादीनेही तसाच विरोध केला होता. मात्र, विरोध असलेल्या मुद्द्यांवर केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्याबरोबर चर्चा करू, तसेच राज्याशी संबंधित मुद्द्यांवर पालकमंत्री गिरीश बापट हे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील, असे शरद पवार यांनीच जाहीर केल्यामुळे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादीची ही भाजपाबरोबर जवळीक असल्याचेच त्यांच्याकडून खासगीत बोलले जात आहे. स्मार्ट सिटीचाच एक भाग असलेल्या २४ तास पाणी या योजनेतील पाणीपट्टीवाढीच्या प्रस्तावालाही काँग्रेसने स्थायी समितीत विरोध केला. मात्र, राष्ट्रवादीने तो भाजपाच्या सहकार्याने मंजूर करून घेतला. सत्तापद वाटपात काँग्रेसच्या वाट्याला या वेळी स्थायी समितीचे अध्यक्षपद आहे. भाजपाबरोबर राष्ट्रवादीची ही जवळीक अशीच कायम राहिल्यास ही पदे मिळणार का? असा प्रश्न आहे.