पुणे : राष्ट्रीय मतदार दिनीच (दि.२५ जानेवारी) काँग्रेसच्या वतीने राज्यात सर्वत्र निवडणूक आयोग मतदानात पक्षपाती धोरण अवलंबत असल्याची टीका करत राज्यव्यापी निदर्शने केली जाणार आहेत. राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर अशी निदर्शने करण्याचे आदेश पक्षाच्या प्रदेश समितीने सर्व पक्षशाखांना दिले आहेत. लोकशाहीच्या रक्षणासाठी व मतदारांच्या मतदानाच्या पवित्र हक्काच्या जपणूकीसाठी काँग्रेस ही मोहिम करत असल्याचे पक्षाने म्हटले आहे.
देशात सर्वत्र २५ जानेवारी (शनिवार) हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. लोकशाही व्यवस्थेत निवडणूक हा महत्वाचा घटक आहे, त्यामुळेच निवडणूक मुक्त, निष्पक्ष वातावरणात पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. सध्याच्या काळात आयोगाकडून ही जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली जात नाही असा काँग्रेसचा आक्षेप आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर मतदान प्रक्रियेविषयी मतदारांच्या मनात संशय निर्माण झाला असल्याचा जाहीर आरोप काँग्रेसने केला आहे. त्याला अनुसरूनच या निदर्शन मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष २५ जानेवारीला त्यांच्या क्षेत्रातील मुख्य सरकारी कार्यालयाबाहेर कार्यालयीन वेळेत निदर्शने करणार आहेत. यासाठी पक्षाच्या नेत्यांना जिल्ह्यांची तसेच शहरांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन व्हावे, मतदारांना पक्षाची भूमिका व्यवस्थित समाजावून द्यावी, त्यासाठी मतदारांशी संपर्क साधावा असे पक्षाने म्हटले आहे.