महिलाच आणतील काँग्रेसची सत्ता : ममता भुपेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 21:24 IST2018-06-04T21:24:05+5:302018-06-04T21:24:05+5:30
जनतेचा विकास फक्त महिलाच उत्तम करू शकते. त्यामुळे यापुढे घरोघरी जाऊन महिला मतदारांशी संपर्क वाढवण्याचे काम सुरू करावे.

महिलाच आणतील काँग्रेसची सत्ता : ममता भुपेश
पुणे: काँग्रेसची देशातील गेलेली सत्ता महिला काँग्रेसच परत मिळवून देईल. त्यासाठी काँग्रेसमध्ये काम करणाऱ्या सर्व महिलांनी नेता नाही तर कार्यकर्ता होऊन घराघरापर्यंत पोहचावे व भाजपा प्रणित केंद्र सरकार करत असलेली जनतेची फसवणूक उघड करून सांगावी असे आवाहन अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सरचिटणीस व पक्षाच्या महाराष्ट्राच्या प्रभारी ममता भूपेश यांनी केले.
महिला काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभागातील कामकाजाच्या आढाव्यासाठी काँग्रेस भवन येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस, नवनिर्वाचित आमदार विश्वजीत कदम, माजी प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे, शहराध्यक्ष रमेश बागवे, महिला शहराध्यक्ष सोनाली मारणे, एनएसयुआयचे अध्यक्ष अमिर शेख, माजी आमदार मोहन जोशी, दिप्ती चवधरी आदी यावेळी उपस्थित होते.
भूपेश म्हणाल्या, सन २०१४ च्या निवडणूकीत वारेमाप आश्वासने देत नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनतेला भूरळ घातली, मात्र आता जनता जागी झाली आहे.जनतेचा विकास फक्त महिलाच उत्तम करू शकते. त्यामुळे यापुढे घरोघरी जाऊन महिला मतदारांशी संपर्क वाढवण्याचे काम सुरू करावे. प्रदेशाध्यक्ष टोकस म्हणाल्या, मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वाधिक नुकसान महिलांचे झाले आहे. ते त्यांच्यासमोर आणले पाहिजे. त्यासाठी समाजात फिरले पाहिजे, संपर्क ठेवला पाहिजे. संधी मिळताच काँग्रेसचे ध्येयधोरणे नागरिकांसमोर आणली पाहिजेत. गेलेली सत्ता यातूनच परत मिळणार आहे. कदम तसेच शेख यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. भूपेश यांनी यावेळी सर्व जिल्ह्यांचा तसेच शहरांचा तेथील पदाधिकाºयांबरोबर बोलून आढावा घेतला. शहर महिला काँग्रेसच्या १०० सभा घेण्याच्या निर्धाराचे त्यांनी कौतूक केले. अनुराधा नागवडे, भारती कोंड, वंदना सातपुते, साधना उगले, जयश्री पाटील, सरोज डाकी, पुणे ग्रामीण अध्यक्ष सिमा सावंत, आदींनी संयोजन केले.