पुणे: देशातील आर्थिक सुधारणांना खरा वेग सन २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतरच झाला असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी केला. मोदी यांनी त्यांच्या आधी तब्बल १७ वर्षे प्रतिक्षेत असलेली जीएसटी ही करप्रणाली धाडसाने देशात लागू केली असे ते म्हणाले.
केंद्र सरकारने जीएसटी करप्रणालीचे ४ स्तर बदलून फक्त २ केले. त्यामुळे देशाच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक स्थितीत काय फरक पडेल याची माहिती देण्यासाठी भाजपच्या वतीने देशात सगळीकडे पत्रकार परिषदांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत पाठक यांनी शनिवारी दुपारी भाजप कार्यालयात पत्रकारांबरोबर संवाद साधला. पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे, तसेच रवींद्र साळेगावकर, अमोल कविटकर, संदीप खर्डेकर, हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर यावेळी उपस्थित होते. पाठक म्हणाले, “जगातील सर्व आर्थिक विकसीत देशात एकच करप्रणाली आहे. भारतासारख्या खंडप्राय देशात अशी एकच एक करप्रणाली आणणे अवघड होते. त्यामुळेच काँग्रेस सरकारला ते जमले नाही. पंतप्रधान झाल्यानंतर मोदी यांनी मात्र धाडसाने हा कर लागू केला. त्यानंतरच देशात आर्थिक क्रांती झाली. आता या कराचे जुने चार स्तर बदलून दोन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यातून आता आर्थिक उत्क्रांती साधणार आहे. सर्वसामान्यांसाठी ही केंद्र सरकारने दिलेली दिवाळी भेटच आहे.”
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पुढची ६७ वर्षे आर्थिक सुधारणांचे वेग मंदच होता. त्यात सन २०१४ नंतर फरक पडला. आर्थिक आकडेवारीतून या सर्व गोष्टी स्पष्ट होतात. काँग्रेस सरकारच्या काळात देशाच्या अर्थनितीत पारदर्शकता नव्हती. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न कमी झाले होते. कर संकलनामध्ये स्पष्टता, सुसुत्रता नव्हती. मोदी यांच्या कार्यकाळात यामध्ये लक्षणीय बदल होत आहेत व त्याचा परिणाम देशाचे स्थुल राष्ट्रीय उत्पन्न वाढण्यात झाला आहे असा पाठक यांनी केला. देशातील २५ कोटी लोकसंख्या दारिद्र्यरेषेखालून बाहेर आली. जागतिक स्तरावर देशाची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमाकांवर पोहचली आहे. मोदी यांनी धाडसाने केलेल्या आर्थिक सुधारणांमुळेच हे शक्य झाले असे पाठक म्हणाले.