लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : अनेक वर्षे सत्ता भोगूनदेखील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविता आले नाहीत. सर्व सहकारी संस्था याच पक्षाच्या नेत्यांच्या ताब्यात आहेत. तरीदेखील दुधाच्या दराचा प्रश्न सोडविता आला नाही. झालेल्या निवडणुकांमध्ये सतत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे सहानुभूती मिळविण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भावनिक मुद्दा केला जात आहे. हा शेतकऱ्यांचा नव्हे तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन होते, तर शिवसेना सत्तेत असतानादेखील ‘डबल ढोलकी’प्रमाणे वागत आहे, अशी टीका भाजपाचे प्रवक्ते आमदार राम कदम यांनी केली. कर्जमाफीला सरकारचा विरोध नाही मात्र, सत्ता जेव्हा आली तेव्हा तिजोरीत खडखडाट काँग्रेस, राष्ट्रवादीने केला होता. गरीब शेतकऱ्यापासून ते मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफीचा निर्णय होईल. परंतु, सुरुवातीला गरीब शेतकऱ्यांना याचा फायदा कसा होईल, यावर सरकार विचार करत आहे, असे कदम यांनी सांगितले. कदम यांनी बारामतीत पत्रकारांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला चांगला भाव देण्याचा प्रयत्न आमचा आहे. दलालाकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी थेट शेतमालाची विक्री सुरू केली. जलयुक्त शिवारसारख्या योजनांतून ११ हजार गावे दुष्काळमुक्त केली. मात्र, ज्यांनी सिंचनाच्या नावाखाली राज्याची लूट केली, त्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शेतकरी आत्महत्येचे पाप आमच्यावर ढकलण्याचा प्रयत्न केले आहे. वास्तविक त्यांनी अनेक वर्षे सत्ता भोगली परंतु, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विशेष लक्ष दिले नाही. त्यामुळे या राज्यातील शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येते, हे पाप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे आहे. सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेची भूमिका सतत दुटप्पी आहे. ‘डबल ढोलकी’प्रमाणे ते वागत आहेत, असा टोला त्यांनी मारला. या वेळी भाजपाचे बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे, यशपाल भोसले, रामदास दिवेकर, ज्ञानेश्वर कौले, राजेश कांबळे, प्रवीण आटोळे आदी प्रमुख उपस्थित होते.
काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची आंदोलनाला फूस
By admin | Updated: June 12, 2017 01:12 IST