महापालिकेत गोंधळ;मनसेचे माजी नगरसेवक शिंदे महापालिका आयुक्तांच्या अंगावर गेले धावून
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 20:57 IST2025-08-06T20:50:14+5:302025-08-06T20:57:54+5:30
आयुक्तांना मी तुला महाराष्ट्र बाहेर पाठवीन अशी दिली धमकी,आयुक्तांच्या बैठकीत विनापरवानगी घुसल्याने वादावादी

महापालिकेत गोंधळ;मनसेचे माजी नगरसेवक शिंदे महापालिका आयुक्तांच्या अंगावर गेले धावून
पुणे :पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत सुरू असलेल्या आयुक्तांच्या बैठकीत माजी नगरसेवक ॲड. किशोर शिंदे हे विना परवानागी घुसले. त्यावरून शिंदे आणि आयुक्त नवल किशोर राम यांच्यात शाब्दिक चकमक होऊन जोरदार वाद झाला. शिंदे यांनी आयुक्तांना मी तुला महाराष्ट्र बाहेर पाठवीन अशी धमकी दिली. त्यावर शिंदे हे मराठी संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात असे वाटत नाही. ते गुंडागर्दी करत होते. त्यामुळे मी घरात घुसून मारेन अशी संतप्त प्रतिक्रिया आयुक्तानी दिली. या घटनेला आता मराठी विरुद्ध अमराठी असा राजकीय रंग चढला आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन करत आयुक्त नवल किशोर राम यांच्या बदलीची मागणी केली.
पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत आयुक्त नवल किशोर राम हे स्वच्छता अभियानासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत होते. त्यावेळी विनापरवानगी माजी नगरसेवक ॲड. किशोर शिंदे यांच्यासह आणखी तीन कार्यकर्ते आयुक्तांच्या बैठकीत घुसले. या मनसेचे नेते अचानक बैठक कक्षामध्ये आल्याने महापालिका आयुक्तांनी विचारले आपण कोण आहात, असे थेट आत कसे आलात, त्यावेळी शिंदे म्हणाले, मी दोन वेळा नगरसेवक होतो. चार वेळा आमदारकी लढवली आहे. त्यावर आयुक्त हिंदीमध्ये म्हणाले आप बाहर निकलो, असे म्हटल्यावर शिंदे यांनी त्यास आक्षेप घेत तुम्ही महाराष्ट्रात आहात, मराठीत बोला! असे सांगितले. त्यावर आयुक्तांनी विचारले, तुमचे काम काय आहे? यावर शिंदे म्हणाले, मी माजी नगरसेवक आहे. त्यावर आयुक्तांनी पुन्हा त्याच प्रश्नाची पुनरावृत्ती केली. यामुळे संतप्त झालेल्या शिंदे यांनी थेट आयुक्तांच्या खुर्चीकडे धाव घेतली. मी तुला महाराष्ट्राबाहेर पाठवीन अशी धमकी शिंदे यांनी दिली. त्यावर आयुक्त संतप्त झाले. महाराष्ट्रात मी अनेक वर्षे काम केले. मात्र बैठकीदरम्यान कुणीही जबरदस्तीने घुसलेले कधी पाहिले नव्हते. शिंदे हे मराठी संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात असे वाटत नाही. ते गुंडागर्दी करत होते.
या संदर्भात आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, ते कार्यकर्ते अचानक बैठकीत शिरले. मी त्यांना ओळखत नाही. अचानक आतमध्ये आल्याने त्यांना बाहेर जा असे हिंदीत बोललो. त्यावर साहेब मराठीत बोला नाहीतर महाराष्ट्राबाहेर घालवू असे ते म्हणाले, यामुळे मी सकाळपासून मराठीतच बैठक घेत आहे. यावर ते अंगावर धावून आले. हा प्रशासनाचा अवमान आहे. त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली आहे. मनसे कार्यकर्ते हे फक्त गोंधळ घालण्याच्या हेतूने या ठिकाणी आले. त्यांचे कुठले विकासात्मक काम असते तर आम्ही समजून घेतले असते. मात्र त्यांचे तसे कुठले नागरिकांचे प्रश्न नव्हते. फक्त गोंधळ घालणे हा एकच अजेंडा होता. कुठलेही नागरिकांचे प्रश्न घेऊन न येता बैठकीत येऊन हातवारे करून माझ्या अधिकाऱ्यांसमोर असे बोलणे योग्य नव्हते. शिवाय त्यांनी धमकीची भाषा वापरली आहे, असेही नवल किशोर राम यांनी सांगितले.
ॲड. किशोर शिंदे म्हणाले, आम्ही आयुक्त बंगल्यातील साहित्य गायब झाल्याप्रकरणी निवेदन देण्यासाठी आलो होतो. बाहेर काही वेळ थांबल्याने बैठक कधी संपणार हे विचारण्यासाठी गेलो होतो. त्यांनी तू कोण? या भाषेत विचारणा केली. आमच्या गुंड असा उल्लेख केला. त्यामुळे आम्ही बैठक कक्षाच्या बाहेर ठिय्या मारला. परंतु काही वेळाने त्यांनी परत आमच्या ठिकाणी येत तुमची गुंडगिरी सहन केली जाणार नाही, असा पुनरुच्चार केला. कर्मचाऱ्यांनी आमच्याकडील मोबाईल काढून घेतला. आयुक्तांनी मराठी लोकांना गुंड म्हणणे आम्ही कदापि सहन करणार नाही. आमच्यावर गुन्हे दाखल करा. आयुक्त कार्यालयाच्या आवारातील सीसीटीव्ही तपासा, मोबाईलवरील चित्रीकरण तपासा. आम्ही मागे हटणार नाही असा दावा शिंदे यांनी केला.
मनसेच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
पालिकेत हा प्रकार घडल्याचे कळताच मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पालिकेत गोळा झाले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणााबाजी केली. मनसेचे नेते बाबू वागसकर, रणजीत शिरोळे, साईनाथ बाबर हे पालिकेत आले. त्यांची व आयुक्तांची बराच वेळ बैठक सुरू होती.
पालिकेत मोठा पोलिस बंदोबस्त
पालिकेत हा प्रकार घडल्यानंतर मोठा प्रमाणात पोलिस फौजफाटाही मागविण्यात आला. पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पोलिस आयुक्तांना फोन केला. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक, वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि पोलिस यांनी पालिकेत धाव घेतली. महापालिकेची सर्व प्रमुख दरवाजे बंद करण्यात आले. एवढेच नव्हे तर आयुक्त कार्यालयातील सर्व दरवाजे बंद करण्यात आल्याने अनेकजण आतमध्ये अडकून पडले होते.
राज ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा
पुणे महापालिकेत घडलेल्या घटनेची मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना माहिती दिली. राज ठाकरे म्हणाले, मी योग्य त्या ठिकाणी बोलतो. राज ठाकरे यांनी आम्हाला आदेश दिले आहेत.
राजकीय वातावरण तापणार
महापालिकेच्या राजकारणात नव्याने वाद पेटण्याची शक्यता असुन वादात भाषा आणि प्रांतीय ओळख या मुद्द्यांचा समावेश झाल्यामुळे प्रकरण आणखी गंभीर होण्याची चिन्हे आहेत.