दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेला संगणक अभियंता गजाआड; एटीएसची पुणे स्टेशन परिसरात कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 09:21 IST2025-10-28T09:21:36+5:302025-10-28T09:21:57+5:30
तरुण अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले असून तो संपर्कात कसा आला? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेला संगणक अभियंता गजाआड; एटीएसची पुणे स्टेशन परिसरात कारवाई
पुणे: दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या संगणक अभियंता तरुणाला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी पुणे रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली. एटीएसने ९ ऑक्टोबर रोजी कोंढवा, वानवडी, खडकी भागांत छापे टाकले होते. या प्रकरणात कोंढव्यातील संगणक अभियंता तरुणाला अटक करण्यात आली आहे. एटीएसच्या कारवाईनंतर तो चेन्नईला गेला होता. चेन्नईहून पुणे रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. जुबेर हंगरगेकर (३२, रा. कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यान्वये (यूएपीए) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झुबेर मूळचा सोलापूरचा असून, तो उच्चशिक्षित आहे. तो माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत असल्याची माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिली.
एटीएसने ९ ऑक्टोबर रोजी कोंढवा, वानवडी, खडकीसह शहरातील वेगवेगळ्या भागात कारवाई केली होती. याप्रकरणात १८ जणांना संशयावरुन तााब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडून १९ लॅपटॉप, मोबाइल तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले होते. जुबेर हा दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली होती. झुबेर हा चेन्नईला गेला होता. चेन्नईहून परतताच त्याला पुणे रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
२०२३ मध्ये पुण्यात पकडलेल्या ‘आयसीस’च्या दहशतवाद्यांनी मुंबई, पुणे, तसेच गुजरातमधील प्रमुख शहरात बाॅम्बस्फाेट घडवून आणण्याचा कट रचला होता. कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील जंगलात त्यांनी बाॅम्बस्फोटाची चाचणी केली होती. पुण्यातील कोंढवा भागात त्यांनी बाॅम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे तपासात उघडकीस आले होते. दहशतवादी महाराष्ट्रात ‘आयसीस’च्या दहशतवादी विचारधारेचा प्रसार करून तरुणांची माथी भडकावत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यांनी पुणे, मुंबईसह गुजरातमधील मोठ्या शहरात बाॅम्बस्फोट घडवण्याचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
अल कायदाच्या संपर्कात?
झुबेर हंगरगेकरला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. झुबेर याच्या लॅपटॉपमधून काही धागेदोरे मिळाले आहेत. तसेच त्याच्या घरातून काही आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे. तो अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो अल कायद्याच्या संपर्कात कसा आला? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. तपासासाठी त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याची विनंती विशेष सरकारी वकील विलास पठारे यांनी युक्तिवादात केली. न्यायालयाने त्याला ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.