पुण्यात नववधूची तक्रार; पती नपुंसक असल्याचे लपवून ठेवत विवाह लावून दिल्याप्रकरणी सहाजणांविरोधात गुन्हा
By किरण शिंदे | Updated: December 11, 2025 12:07 IST2025-12-11T12:07:20+5:302025-12-11T12:07:35+5:30
तिने पती आणि सासरच्या लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, तिच्यावरच धमक्या देण्यात आल्या, असा आरोप तिने केला आहे.

पुण्यात नववधूची तक्रार; पती नपुंसक असल्याचे लपवून ठेवत विवाह लावून दिल्याप्रकरणी सहाजणांविरोधात गुन्हा
पुणे – लग्नानंतरच पती नपुंसक असल्याचे समोर आल्यानंतर एका विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून समर्थ पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या सहाजणांविरोधात फसवणूक, धमकी देणे आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगा नपुंसक असल्याची माहिती असूनही ते लपवून ठेवत संगनमताने लग्न लावून दिल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी २३ वर्षीय तरुणीचे लग्न १८ एप्रिल २०२५ रोजी झाले. लग्नानंतर काही दिवसांतच पती नपुंसक असल्याचे तिला लक्षात आले. याबाबत स्पष्टीकरण मागण्यासाठी तिने पती आणि सासरच्या लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, तिच्यावरच धमक्या देण्यात आल्या, असा आरोप तिने केला आहे.
पतीच्या नपुंसकतेबाबत कुणाला सांगितल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. शिवाय, तिचेच इतर व्यक्तीसोबत संबंध असल्याचा खोटा आरोप करून सासरकडील मंडळींनी तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. लग्नातील मानपान, वागणूक तसेच किरकोळ कारणांवरून तिच्यावर सतत मानसिक छळ केला जात असल्याचेही ती म्हणाली.
या सर्वांबरोबरच पती नपुंसक असूनही हे सत्य जाणीवपूर्वक लपवून ठेवत फसवणूक केल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे. या प्रकरणी पती, सासू, सासरे, ननंद, ननंदेचा पती आणि चुलत सासरा अशा सहाजणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. समर्थ पोलीस ठाण्याचे पथक या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.