पुणे : शहरातील रस्ते आदर्श व खड्डेमुक्त केल्याचा दावा करणाऱ्या महापालिकेच्या पथ विभागाचे पितळ मागील दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे उघडे पडले आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे दिसत असून, पथ विभागाकडून पाणी साचलेल्या खड्ड्यांमध्ये कोल्डमिक्स व हॉटमिक्स मटेरियल टाकून ते बुजविण्याचा प्रताप केला जात आहे.
दरवर्षी, महापालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्यांची कामे केली जातात. मात्र, रस्त्यांची कामे करताना कामाचा दर्जा राखला जात नाही. शहरातील रस्ते खड्डेमुक्त करून ते आदर्श करण्याची मोहीम पथ विभागाने हाती घेतली. ही कामे पूर्ण झाल्याचा दावाही केला. मात्र, दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर खड्डे पडल्याने हा दावा फोल ठरला आहे. खड्ड्यांची दुरुस्ती तातडीने करण्यासाठी महापालिकेच्या पथ विभागाने पथके नेमली आहेत. भरपावसात हे खड्डे बुजवण्याचे काम पथ विभागाचे कर्मचारी करत आहेत. खड्डे बुजवण्याआधी त्यातील पाणी काढणे अपेक्षित असते, मात्र कर्मचाऱ्यांनी थेट त्यात कोल्डमिक्स टाकून खड्डे बुजवले. दरम्यान, रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे कोल्डमिक्समधील खडी वाहून गेली असून, पुन्हा रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’ झाली आहे.
पथ विभागाचे कारवाईचे आदेश
अशा पद्धतीने जर खड्डे बुजवले जात असतील तर ते चुकीचे आहे. याबाबत संबंधित क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्याला ठेकेदारावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. - अनिरुद्ध पावसकर, पथ विभागप्रमुख, महानगर पालिका