Pune Municipal Corporation: महापालिकेला आचारसंहिता लागू होणार नाही; आयुक्तांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 18:57 IST2025-11-04T18:57:09+5:302025-11-04T18:57:25+5:30
आचारसंहिता पालिकेला लागू झाली असती तर अनेक नवीन कामांच्या निविदा आणि कामे रखडली असती

Pune Municipal Corporation: महापालिकेला आचारसंहिता लागू होणार नाही; आयुक्तांचे स्पष्टीकरण
पुणे : राज्यातील २४६ नगरपालिका, ४२ नगरपंचायतींची निवडणूकीसाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. पण ही आचारसंहिता पुणे महापालिकेला लागु होणार नाही असे पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुणे महापालिकेच्या अनेक नवीन कामे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींची निवडणूकीची घोषणा झाल्यापासुन आचारसंहिता लागु झाली आहे. या निवडणुकीसाठी २ डिसेंबरला मतदान आणि मतमोजणी ३ डिसेंबरला होणार आहे. या निवडणुकीची आचारसंहिता पुणे महापालिकेला लागु होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. आचारसंहिता पालिकेला लागु झाली असती तर अनेक नवीन कामांच्या निविदा आणि कामे रखडली असती. पण या निवडणुकीची आचारंसहिता संबंधित नगरपालिका आणि नगरपंचायती क्षेत्रापुरती आहे. त्यामुळे पुणे महापालिकेला या निवडणुकीची आचारसंहिता लागु होत नाही. या संदर्भात पालिका आयुक्त नवल किशोर राम यांना विचारले असता ते म्हणाले, या संदर्भात राज्याच्या सचिवाकडे विचारणा केली. त्यावर नगरपालिका, नगरपंचायतींची निवडणूकीसाठीची आचारसंहिता पालिकेला लागु होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.