पुणे : भारतीय रेल्वे ही जगातील चौथी सर्वांत मोठी रेल्वे व्यवस्था आहे. भारतातील सध्याच्या रेल्वे मार्गांची एकूण लांबी ६७ हजार ४१५ कि.मी. इतकी असून, रेल्वेतून दररोज २ कोटी ३१ लाख प्रवासी आणि ३३ लाखांहून अधिक टन मालाची वाहतूक होते. पूर्वी रेल्वे कोळसा, डिझेलवर धावायची आणि आता विजेवर धावत आहे.
स्वातंत्र्यापूर्वी पुणे जिल्ह्यातून पहिल्यांदा पुणे ते खंडाळा या मार्गावर १४ जून, १८५८ रोजी रेल्वे धावली. त्यानंतर दोन वर्षांतच पुणे ते दाैंड मार्गावर रेल्वे सुरू झाली. कालांतराने यात बदल होत गेले. सुरुवातीला कोळशाद्वारे धावणारी रेल्वे नंतरच्या काळात डिझेल आणि आता विजेवर वेगाने धावत आहे. शिवाय रेल्वेच्या स्वरूपातही बदल होऊन प्रवाशांना आरामदायी प्रवासासाठी सेवा देण्यात रेल्वेचे योगदान महत्त्वाचे आहे. देशात रेल्वेच्या स्वमालकीची १२ हजार १४७ इंजिन आणि ७४ हजार ३ प्रवासी डबे आहेत. दैनंदिन ८ हजार ७०२ प्रवासी गाड्यांसह एकूण १३ हजार ५२३ गाड्या धावतात. या रेल्वेला १६७ वर्षे झाली आहेत.
१८ ते २४ डब्यांची प्रवासी रेल्वे
देशातील ८ हजार ७०२ रेल्वेतून दरवर्षी ५ अब्ज नागरिक प्रवास करतात. यातील बहुतांशी रेल्वे या लांब पल्ल्याच्या मार्गांवर धावतात. प्रवासी गाडीमध्ये १८ रेल्वे डबे असतात. जास्त प्रवासी संख्या असलेल्या मार्गांवरील काही गाड्यांमध्ये डब्यांची संख्या २४ पर्यंतदेखील असते. एका डब्याची क्षमता १८ पासून ७२ प्रवासी वाहून नेण्याची असते. प्रत्येक डब्याची रचना एका वर्गाच्या प्रवासासाठी केलेली असते. देशातील रेल्वे प्रवासाचे अंतर खूप लांबचे असल्याने शयनयान डबे जास्त वापरात आहेत. सामान्य गाडीत ३ ते ५ वातानुकूलित डबेही असतात.
रेल्वेगाड्यांचे विविध प्रकार
- जलद (एक्स्प्रेस)- अतिजलद (सुपरफास्ट एक्स्प्रेस)- वातानुकूलित जलद- वातानुकूलित अतिजलद- दुमजली जलद (डबल डेकर एक्स्प्रेस)- शताब्दी एक्स्प्रेस- राजधानी एक्स्प्रेस- जनशताब्दी एक्स्प्रेस- दुरांतो एक्स्प्रेस- हमसफर एक्स्प्रेस- तेजस एक्स्प्रेस- वंदे भारत
शताब्दी एक्स्प्रेस
ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी रेल्वे गाडी आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सुरू करण्यात आली, म्हणून तिला ‘शताब्दी एक्स्प्रेस’ म्हणतात. ही गाडी दिवसा धावते आणि त्याच दिवशी आपल्या मूळ ठिकाणी परत येते. ‘पुणे ते सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेस’ ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे.
राजधानी एक्स्प्रेस
रेल्वेद्वारे चालवली जाणारी ही एक विशेष प्रवासी रेल्वे सेवा आहे. ‘राजधानी एक्स्प्रेस’ नावाने धावणाऱ्या जलदगती रेल्वेगाड्या राजधानी नवी दिल्लीला इतर राज्यांच्या राजधानीच्या शहरांसोबत जोडतात. ‘मुंबई राजधानी एक्स्प्रेस’ एक जलदगती रेल्वे आहे. ही राजधानी एक्स्प्रेस नवी दिल्ली व मुंबई या दोन शहरांना जोडते.
दुरांतो एक्स्प्रेस
रेल्वेची ही एक विशेष जलद प्रवासी रेल्वे गाडी आहे. ही गाडी सुरुवातीच्या स्थानकापासून थेट शेवटच्या स्थानकापर्यंत कमीतकमी थांबे घेते. सुरुवातीला ही गाडी थांबे न घेता धावत होती; पण, नंतर तांत्रिक कारणांमुळे थांबे देण्यात आले. पुण्यावरून पुणे ते हावडा आणि पुणे ते दिल्ली या दोन शहरांसाठी दुरांतो एक्स्प्रेस धावते.
तेजस एक्स्प्रेस
रेल्वेची वेगवान आणि आलिशान ट्रेन आहे. ही ट्रेन मुंबई-मडगाव (गोवा) आणि लखनऊ-दिल्ली दरम्यान चालते. तेजस एक्स्प्रेसमध्ये वाय-फाय, मनोरंजन स्क्रीन, स्वयंचलित दरवाजे आणि बायो-व्हॅक्यूम शौचालय यांसारख्या आधुनिक सुविधा आहेत. तेजस एक्स्प्रेस ताशी १६० किमी वेगाने धावू शकते.
वंदे भारत
वंदे भारत एक्स्प्रेस ही रेल्वेची द्रुतगती रेल्वे सेवा आहे. वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनमध्ये २ एक्झिक्युटिव्ह क्लासचे डबे आणि १४ चेअर कार कोच असतात. पुण्यातून सध्या पुणे ते कोल्हापूर, पुणे ते बेळगाव आणि नुकतीच पुणे ते नागपूर या तीन मार्गांवर वंदे भारत धावते.