पुणे : राज्यातील विविध जिल्ह्यांमधील कोविड सेंटरमध्ये घडत असलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये वारंवार फायर ऑडिट केले जात आहे. यासोबतच कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांना अग्निप्रतिरोधक यंत्रणा कशी वापरायची आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांच्या बचावासाठी नेमके काय करायचे याचे प्रशिक्षण दिले जात आहे. विरार येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व ठिकाणी पुन्हा फायर ऑडिट करून घेण्यात येणार असून खाजगी रुग्णालयांनाही याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. सर्वच रुग्णालयांमधील 'फायर सेफ्टी'वर बारीक लक्ष ठेवण्यात येत असल्याचे अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. त्यानंतर डॉ. नायडू रुग्णालयामध्ये पहिले कोविड केअर सेंटर सुरू झाले. तेव्हापासून अग्निशामक दल दुर्घटना रोखण्यासाठी सज्ज झाले. खाजगी तसेच शासकीय सेंटरमध्ये सातत्याने अग्नि प्रतिरोधक यंत्रणेची पाहणी केली जात आहे. तसेच तेथील अग्निप्रतिरोधक यंत्रणेसंदर्भातील सर्वेक्षण अहवाल दिला जात आहे. यासोबतच प्रशिक्षणावरही भर देण्यात आलेला आहे. ऑडिट करीत असताना आढळलेल्या त्रुटी दूर करण्यासंदर्भात तसेच चुका करण्यासंदर्भात संबंधित कोविड केअर सेंटरला अग्निशामक दलाकडून पत्रही देण्यात आलेली आहेत. याबाबतचे सविस्तर अहवाल सातत्याने अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्तांना पर्यंत देण्यात आलेले आहेत.
नुकत्याच नाशिक आणि विरार येथे दोन दुर्घटना घडल्या. यामध्ये अनेक कोरोना रुग्णांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे पुन्हा एकदा शहरातील सर्व कोविड सेंटरचे फायर ऑडिट करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात अग्निशामक दलाच्या सर्व अधिकार्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी सर्वांना खाजगी व शासकीय रुग्णालयांमध्ये फायर ऑडिट सुरु करण्यासंदर्भात परिपत्रक देण्यात आले. ज्या रुग्णालयांमध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणा बंद असेल त्यांना नोटीस देऊन ती सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्याचा ही सूचना देण्यात आल्या आहेत.