सफाई कर्मचारी महिलेने परत केली दीड किलो चांदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 20:07 IST2019-08-29T20:06:40+5:302019-08-29T20:07:10+5:30
कचरा समजून त्यांनी ही पिशवी उचलून त्यांच्याजवळील प्लास्टीकच्या बकेटमध्ये टाकली...

सफाई कर्मचारी महिलेने परत केली दीड किलो चांदी
पुणे : कष्टकऱ्यांच्या प्रामाणिकपणाच्या कथा नेहमीच ऐकिवात येत असतात. अशीच एक घटना गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास बिबवेवाडीमध्ये घडली. रस्ता झाडणाऱ्या महिलेने तब्बल दीड किलो चांदीचे दागिने असलेली रस्त्यावर सापडलेली पिशवी पोलीस ठाण्यात जमा केली. या महिलेच्या प्रामाणिकपणबद्दल पोलिसांनी तिचा सत्कार केला.
पुणे महानगरपालिकेच्या सफाई कर्मचारी कस्तुराबाई गोरख हनवते (वय ५०, रा. पर्वती दर्शन) या बिबवेवाडीमध्ये नेमणुकीस आहेत. नेहमीप्रमाणे त्या नेमून दिलेल्या परिसरामध्ये झाडण काम करीत होत्या. कोठारी ब्लॉक येथे रस्त्यावर स्वच्छता करीत असताना त्यांना एक प्लास्टिकची पिशवी रस्त्यावर पडलेली आढळली. कचरा समजून त्यांनी ही पिशवी उचलून त्यांच्याजवळील प्लास्टीकच्या बकेटमध्ये टाकली. त्यावेळी धातूचा पडल्यासारखा आवाज आल्याने त्यांनी ही पिशवी उघडून पाहिल्यावर त्या चकीत झाल्या. या पिशवीमध्ये चांदीची आभुषणे होती.
त्यांनी तातडीने सफाई निरीक्षक सचिन पवार यांच्याशी संपर्क साधून त्यांना ही बाब निदर्शनास आणून दिली. पवार यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर स्थानिक नगरसेविका मानसी देशपांडे यांच्यासह पवार, कस्तुराबाई चांदीची आभुषणे असलेली पिशवी घेऊन पोलीस ठाणे गाठले. ही पिशवी व दागिने पोलिसांच्या हवाली केली. या पिशवीमध्ये दीड किलोचे गणपतीचा साज असलेले दागिने मिळून आल्याचे वरिष्ठ निरीक्षक मुरलीधर करपे यांनी सांगितले.
कस्तुराबाई यांनी कोणताही मोह न ठेवता लाखभर रुपयांचे चांदीचे सापडलेले दागिने प्रामाणिकपणे पोलिसांकडे सुपुर्द केले. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल बिबवेवाडी पोलीस ठाण्यात नगरसेविका मानसी देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते रामविलास माहेश्वरी, वरिष्ठ निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच सफाई निरीक्षक सचिन पवार त्यांचे सहकारी डिंबळे, शब्बीर शेख, विनोद साबळे, श्रीधर कांबळे आणि महेश हरनावळ यांचेही अभिनंदन यावेळी केले.