पुणे : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी (दी. ४) पहिल्यांदाच तीर्थक्षेत्र आळंदीत दाखल झाले. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी माऊलींच्या समाधीला अभिषेक व महापूजा करत 'श्रींचे' दर्शन घेतले. दरम्यान आळंदी शहरात भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जंगी स्वागत केले. इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जातील असे आश्वासन त्यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहे.
फडणवीस म्हणाले, इंद्रायणी प्रदूषित आहे. इंद्रायणीच्या स्वच्छतेचं काम चाललंय. आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. की इंद्रायणीची स्वच्छता हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही. जवळजवळ सगळ्या शहरांचं, गावांचं आणि उद्योगाचं पाणी हे त्याठिकाणी जातं ते सगळं एकत्र करून ते सगळं शुद्ध करून आपल्याला शुद्ध पाणी इंद्रायणीत सोडायचं आहे. त्याचा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे. मागेच लॉन्च केला आहे. सगळ्या वेगवेगळ्या गावांना ग्रामपंचायतींना, नगरपालिकांना, महानगरपालिकांना आपण निधी उपलब्ध करून देतो आहोत. उद्योग विभागाला देखील आपण सांगितलेलं आहे. त्यासाठी व्यवस्था उभी करावी लागते ती व्यवस्था उभे करण्याचं काम हे सुरू केलेलं आहे.
महाराष्ट्र भविष्यातही पुढे जात राहील
खरं म्हणजे पांडुरंगाच्या आशीर्वादानं एक मोठा विजय आम्हाला प्राप्त झालेला आहे. आणि त्यानंतर आळंदीला येण्याची संधी मिळाली. माऊलींचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली. मला असं वाटतं की प्रत्येकाकरता हा क्षण अतिशय सुखाचा असतो. तो क्षण मला अनुभवायला मिळालेला आहे. खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर माऊलींपासून तर जगतगुरु तुकाराम महाराजांपर्यंत हा जो आमचा वारकरी विचार आहे. या विचाराने आपला महाराष्ट्र सातत्याने पुढे गेलाय आणि भविष्यातही पुढे जात राहील असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे.