अभाविप-एनएसएयूआय विद्यापीठात एकमेकांना भिडले : नक्षलवाद विषयक पुस्तके विक्रीचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 19:50 IST2018-11-26T19:04:10+5:302018-11-26T19:50:17+5:30
समाजामध्ये दुही पसरवणा-या आणि जातीयवादी पुस्तकांची विक्री केली जात असल्याचा आरोप करत अभाविपच्या कार्यकर्त्यांनी या पुस्तक विक्रीस विरोध केला.

अभाविप-एनएसएयूआय विद्यापीठात एकमेकांना भिडले : नक्षलवाद विषयक पुस्तके विक्रीचा आरोप
पुणे: सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठ आवारात परवानगीशिवाय स्टॉल उभा करून जेएनयु राष्ट्रविरोधी रोजनिशी डायरी तसेच नक्षलवाद या विषयावरील वादग्रस्त पुस्तकांची विक्री केली जात असल्याचा आरोप करून अखील भारतीय विद्यार्थी परिषदेने पुस्तक विक्रीस विरोध केला. त्यातून अभाविप व एनएसयुआयच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला.दोन्ही संघटनांच्या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केल्यामुळे विद्यापीठात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
विद्यापीठातील अनिकेत कँन्टीनजवळ विद्यापीठ प्रशासनाच्या परवानगीशिवाय पुस्तक विक्रीचा स्टॉल लावून पुस्तकांची विक्री व काही पुस्तकांचे वाटप केले जात होते. त्यात समाजामध्ये दुही पसरवणा-या आणि जातीयवादी पुस्तकांची विक्री केली जात असल्याचा आरोप करत अभाविपच्या कार्यकर्त्यांनी या पुस्तक विक्रीस विरोध केला. विना परवानगी सुरू केलेला पुस्तक विक्रीचा स्टॉल काढण्याच्या सुचना विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाच्या अधिका-यांनी संबंधित स्टॉल धारकाला केल्या होत्या.मात्र,तरीही हा स्टॉल सुरू ठेवण्यात आला.
विद्यापीठातील अभाविचा विद्यार्थी कार्यकर्ता सचिन लांबुटे याने या स्टॉलला भेट दिली.त्यावेळी त्याला समाजात दुही पसरवणा-या आणि नक्षलवादाला समर्थन करणारी पुस्तके वाटली जात असल्याचे दिसून आले. यावर विद्यापीठ प्रशासनाकडे याबाबत चौकशी केली असता, प्रशासनाच्या परवानगीशिवाय असा प्रकार घडत असल्याचे अभाविपच्या कार्यकर्त्यांना दिसून आले.त्यामुळे विद्यापीठात एनएसयुआय व अभविपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद मिटविण्यासाठी विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाला पोलिसांना पाचारण करावे लागले.परिणामी विद्यापीठ प्रशासनाने येथील दोन्ही पुस्तक विक्रीचे स्टॉल बंद केले. तर परवानगीशिवाय पुस्तक विक्री करणा-यांवर विद्यापीठ प्रशासनाने कडक कारवाई करावी,या मागणीचे निवेदन अभाविपतर्फे विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आले.