जुना पूल पाडण्यास शहर सुधारणा समितीची मान्यता

By राजू हिंगे | Updated: December 14, 2024 13:09 IST2024-12-14T13:08:17+5:302024-12-14T13:09:08+5:30

ओंकरेश्वर मंदिर ते रिद्धेश्वर-सिद्धेश्वर घाटाला जोडणारा जुना पूल

City Improvement Committee approves demolition of old bridge | जुना पूल पाडण्यास शहर सुधारणा समितीची मान्यता

जुना पूल पाडण्यास शहर सुधारणा समितीची मान्यता

पुणे : मुठा नदीपात्रात तब्बल ५५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला ओंकरेश्वर मंदिर ते रिद्धेश्वर - सिद्धेश्वर घाटाला जोडणारा जुना पूल (काॅजवे) पाडण्यास शहर सुधारणा समितीने मान्यता दिली आहे. हा पूल धोकादायक झाला असून, पावसाळ्यात मुठा नदीपात्रातील पाण्याला हा पूल अडथळा ठरत आहे. त्यामुळे हा पूल पाडण्यात येणार आहे. नदीपात्रातील या पुलाची लांबी ५० मीटर, तर रुंदी अवघी ४.७ मीटर आहे.

या पुलाचा वापर स्थानिक नागरिक नदी ओलांडणे, वाहने धुणे, मासे पकडणे, प्राण्यांच्या स्वच्छतेसाठी करतात. वाहतुकीसाठी या पुलाचा वापर होत नाही. मात्र, दरवर्षी या पुलामुळे जलपर्णी आणि कचरा अडकला जातो. हा पूल जीर्ण झाला असून, तो वाहतुकीसाठी सुरक्षित नाही. त्यावर वारंवार खड्डे पडत असून, त्याच्या दुरुस्तीसाठी मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या पुलाचे ऑडिट केले होते. त्यात या पुलाची दुरुस्ती केल्यास ३९ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. दुरुस्तीनंतर त्याचे आयुर्मान केवळ ८ वर्षे वाढणार आहे. मात्र, त्याचा वापर केवळ दुचाकीसाठी होणार आहे. या पुलाच्या बांधकामानंतर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल आणि जयंतराव टिळक पूल बांधण्यात आला.

हे दोन्ही पूल वापरात असल्याने तसेच दुरुस्तीनंतर “काॅजवे’चा फारसा वापर होणार नसल्याने हा पूल पाडला जाणार आहे. हा पूल पाडल्यानंतर त्याचा फायदा महापालिकेच्या नदीकाठ विकसन प्रकल्पासह पूरस्थितीच्या काळातही होणार आहे. नदीत सर्वांत कमी उंची असलेल्या या पुलाच्या खांबाला जलपर्णी तसेच कचरा अडकतो. परिणामी, पावसाळ्यात पाण्याला मार्ग मिळत नाही. त्यामुळे नदीतील अडथळे काढण्यासाठीही पालिका उपाययोजना करत आहे. त्यात या कामाचा फायदा होणार आहे.

Web Title: City Improvement Committee approves demolition of old bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.